यंदाच्या गणपतीदरम्यान कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने दोनशेहून अधिक विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला खरा, पण या गाडय़ा चालवताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. रविवारी करंजाडी स्थानकाजवळ मालगाडी घसरल्यानंतर कोलमडलेले कोकण रेल्वेमार्गावरील वेळापत्रक अजूनही सुरळीत झालेले नाही. या घटनेनंतर तब्बल ५०० मीटरच्या रेल्वेमार्गावरील स्लीपर्स बदलण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आल्याने या मार्गावरील वेळापत्रकाचा बट्टय़ाबोळ झाला. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नियमित आणि विशेष, अशा दोन्ही गाडय़ा आठ ते दहा तास उशिराने धावत होत्या. परिणामी गावच्या ओढीने गाडीत बसलेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
खेडजवळील करंजाडी स्थानकाजवळ रविवारी मालगाडीचे सात डबे घसरले. त्यामुळे रेल्वेमार्गाचे नुकसान झाले होते. हे सात डबे उचलून तात्पुरते स्लीपर्स टाकून कोकण रेल्वेने वाहतूक सुरू केली होती. मात्र पुढील दोन दिवसांतील वाहतुकीचा ताण लक्षात घेता हे स्लीपर्स बदलण्यासाठी कोकण रेल्वेने मंगळवारी विशेष ब्लॉक घेत काम सुरू केले.
या कामाचा मोठा फटका मंगळवारी सकाळी आणि सोमवारी रात्री कोकणाकडे रवाना झालेल्या सर्वच गाडय़ांना बसला. सकाळी ५.२५ वाजता मुंबईहून निघालेली जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी तीनच्या सुमारास मडगावला पोहोचते. मात्र मंगळवारी या वेळी ही गाडी रोहा स्थानकात थांबून राहिली होती. या गाडीबरोबरच सकाळी सहाच्या सुमारास दिव्याहून निघालेली दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीही रोह्यालाच थांबली होती. तर सकाळी सात वाजता मुंबईहून सुटणारी मांडवी एक्सप्रेस मुळातच दुपारी १.२० वाजता मुंबईहून रवाना झाली. ही गाडी दुपारी तीन-चारच्या सुमारासही मुलुंडजवळच थांबवण्यात आली होती. त्यापाठोपाठ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही विशेष गाडी भांडूप स्थानकात उभी केली होती. नेत्रावती एक्स्प्रेसही आपटा आणि रोहा या स्थानकांत दोन-दोन तास थांबवून ठेवण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
चाकरमान्यांच्या हालअपेष्टा ‘अनंत’
यंदाच्या गणपतीदरम्यान कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने दोनशेहून अधिक विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला खरा, पण या गाडय़ा चालवताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे.
First published on: 27-08-2014 at 12:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goods train derailment hit konkan railway time table