राजस्थानामधील गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्य असल्याची बतावणी करून अनेक तरूणींची फसवणूक करणाऱ्या ठकसेनाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. पुखराज देसाई ऊर्फ राजबीर सिंह, असे अरोपीचे नाव असून त्याने तरूणींशी जवळीक साधून त्यांची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आरोपीविरोधात खंडणी विनयभंग, धमकी दिल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- ८४ झाडे कापण्याची परवानगी मिळणार का? आरे कारशेड प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
याप्रकरणातील तक्रारदार महिला विवाहित असून गोरेगाव येथे वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेला राजबीर सिंह नावाच्या एका तरुणाने समाज माध्यमांवर मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. तिने प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. याचदरम्यान त्यांनी आपापले मोबाइल क्रमांक एकमेकांना दिले. त्यानंतर सतत ते दोघेही चॅट आणि मोबाइलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. राजबीरने तिला तो राजस्थानामधील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितले होते. तिच्याशी जवळीक करून त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि तिला लग्नाची मागणी घातली होती. काही दिवसांनी त्याने तिची खाजगी अश्लील छायाचित्रे मिळविली होती. ती छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. बदनामीच्या भीतीने तिने त्याला चार लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही तो तिला सतत धमकावतच होता. त्यामुळे तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खंडणीसह विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच राजबीर सिंह ऊर्फ पुखराज देसाईला गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. त्याने अशा प्रकारे इतर काही तरुणी महिलांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तो समाज माध्यमांवर सक्रिय असून त्याने राजस्थानमधील राजघराण्यातील सदस्य असलेल्या व्यक्तीप्रमाणे छायाचित्र काढून ते समाज माध्यमांवर अपलोड केले होते. त्यानंतर तो काही तरुणीसह महिलांना मैत्रीचा प्रस्ताव पाठवत होता. त्यांच्याशी जवळीक करून विश्वास संपादन केल्यानंतर त्यांची अश्लील छायाचित्र मिळवून तो त्यांना धमकावत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.