मुंबई : हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल भाजप आमदार अ‍ॅड आशीष शेलार यांनी मंगळवारी केला. गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या कार्यक्रमात भाजप सहभागी होणार असल्याचे  शेलार यांनी स्पष्ट केले. हिंदू नववर्षांच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या  मिरवणुकांना परवानगी द्यावी, अशी मागणी विधानसभेत करूनही अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे संभ्रमाचे वातावरण असल्याचे सांगून शेलार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी मुंबईत १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. अतिरेकी, देशविरोधी शक्ती ड्रोन किंवा रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील, अशी शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने पोलिसांना दिला असेल तर सुरक्षा यंत्रणांनी जरूर खबरदारी घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारचा नाकर्तेपणा का ? रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची भूमिका बोटचेपी का असते? कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही सणांना परवानगी देण्यात यावी. आम्ही सार्वजनिक उत्सव मंडळे व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवांमध्ये भाजप कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होतील, असे शेलार यांनी सांगितले. हिंदू सणांना परवानगी देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला आहे.