रस्ते-पुलांचा खर्च ११०० कोटी, कमाई ३३०० कोटींची
भाग २

मुंबई
मुंबईतील रस्ते व उड्डाण पुलांवर झालेल्या ११०० कोटींच्या खर्चाच्या बदल्यात टोलमार्फत गेल्या १२ वर्षांत सुमारे १५०० कोटी रुपये वसूल झाले असून पुढील १५ वर्षांच्या मुदतीत आणखी  १८०० कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबईत प्रवेश करताना व बाहेर जाताना लावण्यात आलेल्या पाच टोलनाक्यांवरून कंत्राटदारांना ३३०० कोटी रुपयांची कमाई होणार आहे. कंगाल सरकारचे कंत्राटदारांना मालामाल करणारे हे टोल धोरण असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत प्रवेश करताना व बाहेर जाताना टोल भरावा लागतो. मुंबईत बांधण्यात आलेले पूल व रस्ते सुधारणा प्रकल्पांवर झालेला खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व) व मुलुंड (पश्चिम) आणि दहीसर असे पाच टोलनाके उभारण्यात आले. त्यावर १९९९-२००० पासून टोलवसुली सुरु करण्यात आली. मुंबईत येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी असते. १९९९ पासून मे. इंडियन एक्स सव्‍‌र्हिस लिग, मे. आयडियल रोड बिल्डर्स, प्रकाश कन्स्ट्रक्शन अ‍ॅंड इंजिनियरिंग कंपनी, जयहिंद कॉट्रॅक्टर प्रा. लि. आणि मे. एम.ई.पी. टोल रोड प्रा. लि. मुंबईच्या टोलवसुलीत या कंपन्यांचा सहभाग राहिला आहे. सध्या एम.ई.पी. कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत हे पाच टोलनाके आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून माहितीच्या अधिकारात लोकसत्ताला मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाने १०७७ कोटी ८४ लाख २९ हजार ९७६ रुपये इतकी रक्कम घेऊन १९९९-२००० पासून वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांना टोल वसुलीचे कंत्राट दिले. गेल्या १२ वर्षांतच मूळ प्रकल्प खर्चाची किंमत वसूल होऊन सुमारे ५०० कोटी रुपयांची अधिकची कमाई झाली. टोलवसुलीच्या कंत्राटाची मुदत २५ वर्षे आहे. वाहनांची रोज वाढत जाणारी वर्दळ व मिळणाऱ्या रकमेच्या विचार करता उर्वरित १५ वर्षांत आणखी १८०० कोटीहून अधिक रक्कम वसूल होणार आहे. म्हणजे ११०० कोटींच्या खर्चाच्या रकमेतून कंत्राटदारांना ३३०० कोटी रुपयांची कमाई होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.     

मुंबईतील टोल नाके
-वाशी, ऐरोली, मुलूंड (पूर्व), मुलूंड (प.) व दहीसर
दररोज वाहनांची वर्दळ – सुमारे १ लाख ५० हजार
महिन्याची टोल वसुली – सुमारे २१ कोटी ५२ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील टोलधाड
प्रकल्प खर्च – १०७७ कोटी ८४ लाख २९ हजार ९७६ रुपये
२०१२ पर्यंत वसुली – १४९१ कोटी २१ लाख १२ हजार ९३० रुपये
पुढील १५ वर्षांत – आणखी १८६४ कोटी १ लाख ४१ हजार १६२ रुपये अपेक्षित
२५ वर्षांत होणारी एकूण वसुली – ३३५५ कोटी २२ लाख ७१ हजार ९२ रुपये