नव्या वर्षांत जीवनवाहिनीचा प्रवाशांना दिलासा
नव्या वर्षांत आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, अशा केवळ शुभेच्छा न देता मध्य रेल्वेने प्रवाशांना खरोखरची भेट देण्याची सोय केली आहे. येत्या वर्षभरात १७ स्थानकांवर तब्बल ४० सरकते जिने आणि १५ स्थानकांतील ३२ फलाटांची उंची वाढवण्याचा संकल्प मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल, असा दावा मध्य रेल्वेचे अधिकारी करत आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेनेही नववर्षांत प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी ११ लोकलफेऱ्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ११ गाडय़ांचा चार ते नऊ मिनिटांचा वेळ कमी करण्यात आला असल्याने अप दिशेला पाच तर डाऊन दिशेला सहा लोकल गाडय़ांच्या वेगात वाढ होईल, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.

‘परे’वरील गाडय़ांचा विस्तार
* चर्चगेट ते वांद्रे लोकल बोरिवलीपर्यंत
* चर्चगेट ते वसई रोड लोकल विरापर्यंत
* बोरिवली ते नालासोपारा लोकल अंधेरी ते विरारपर्यंत
* चर्चगेट ते वांद्रे लोकल भाईंदर स्थानकापर्यत
* बोरिवली ते भाईंदर लोकल नालासोपरा स्थानकापर्यंत
* विरार ते अंधेरी स्थानकांदरम्यान धावणाऱ्या दोन लोकल, वसई रोड ते अंधेरी लोकल चर्चगेटपर्यत
* बोरिवली ते चर्चगेट आणि अंधेरी ते चर्चगेट लोकल आता विरार स्थानकातून सोडण्यात येईल.

फलाटांची उंची येथे वाढणार..
कुर्ला, डॉकयार्ड रोड, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, सानपाडा, बेलापूर, तुर्भे, मशीद, खारघर, नेरुळ, जुईनगर, वाशी आणि कॉटनग्रीन

Capture