मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी आणि कृषीपंपांच्या थकीत वीजबिलाचा वाढता बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अटल सौर कृषीपंप योजनेत ७ हजार शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३९ कोटी रुपयांची ही योजना असून ५४२४ सोलर कृषीपंप खुल्या गटातील शेतकऱ्यांना ९४५ कृषीपंप अनुसूचित जाती व ६३१ कृषीपंप अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी असतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर दुर्गम भागातील एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी राज्य सरकारची योजना तयार करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी जाहीर केले.

अटल सौरकृषीपंप योजनेतील हे ७ हजार कृषीपंप वितरित करताना ५ एकपर्यंतच्या शेतकऱ्यांना ३ अश्वशक्तीचा तर ५ एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ अश्वशक्तीचे पंप देण्यात येतील. या ७ हजार कृषीपंपांमुळे १४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून पारंपरिक कृषी जोडणी खर्चात १२३ कोटी ५० लाख रुपयांची बचत होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, सप्टेंबर महिन्यापासून राज्यातील वीज मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी या कालवधीत १५ हजार ते १७ हजार मेगावॉट वीज मागणी होती. यंदा ती १८ हजार ते २० हजार मेगावॉटपर्यंत गेली असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. मागणीनुसार वीजपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मंत्रिमंडळाचे इतर निर्णय

* पनवेलमध्ये जिल्हा, अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापण्यास मंजुरी

* राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्तरावर विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government to set up 7000 solar agriculture pumps in maharashtra
First published on: 04-10-2018 at 01:49 IST