कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांना काही धागेदोरे मिळाले असून आरोपींचा छडा लावण्यासाठी व्यापक शोधसत्र सुरु असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. पानसरे यांच्या हल्लेखोरांना पोलिस लवकरच जेरबंद करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पानसरे यांच्या हत्येला अनेक दिवस उलटूनही पोलिस अजून आरोपींपर्यंत पोचू शकलेले नाहीत. या हत्येचे कारण आणि हल्लेखोर कोण, हेही उजेडात येऊ शकलेले नाही. विधिमंडळ अधिवेशनात विरोधक सरकारला त्यावरुन धारेवर धरणार आहेत. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हल्लेखोरांचा सुगावा लागल्याचे सांगितले. पोलिसांची २० पथके कसून तपास करीत आहेत,  असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

*सत्ताधारी आणि विरोधक उभयतांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

*सरकारच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी विधान परिषद सभापतींच्या अविश्वास ठरावावरून दोन्ही काँग्रेसमध्ये अंतर वाढविण्याचा प्रयत्न भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे.