एमएमआरडीए क्षेत्रात नियोजन प्राधिकरणाचा संयुक्त विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली सामाईक असावी यासाठी आघाडी सरकारने काम सुरू केले. त्यानंतर निवडणुका लागल्या आणि सरकार बदलले. मात्र, आताचे सरकार नऊ महिने उलटूनही त्याविषयी निर्णय घेऊ शकलेले नसून केवळ आश्वासन देत आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी ठाकुर्लीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
इमारतींचा एकत्रित पुनर्विकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट) लागू झाली तर त्यात बांधकाम व्यावसायिकाचे नुकसान होणार आहे. सत्ताधारी आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये संगनमत असल्यामुळेच ही योजना अद्याप लागू होऊ शकलेली नाही असा आरोपही त्यांनी केला.
धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी क्लस्टर योजना जाहीर करावी अशी मागणी विखे यांनी
केली.
दरम्यान ठाण्यातील इमारत दुर्घटनेच्या संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सामुहिक विकास योजना लागू केल्याशिवाय ठाणे परिसरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटणार नाही याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

रहिवाशी संतप्त
कोणी काहीही करणार नाही, केवळ येथे येऊन आमची विचारपूस करतात. ठोस निर्णय तर कोणी घेत नाही. आम्ही आमची माणसे येथे गमावली आहेत, यांना त्याचे दु:ख काय कळणार. कोणाला तरी आमचे दु:ख समजेल या जाणिवेने आम्ही उपाशीतापाशी दोन ते-तीन तास त्यांची वाट पाहत उभे आहोत. मात्र, ते विचारपूस करून आश्वासन देऊन निघून गेले. माझा मुलगा पार्थिक याला मी यात गमावले आहे. आमची जी काही सोय करायची आहे ती येथेच करा अशी प्रतिक्रिया ईश्वर झांझारिया यांनी या वेळी व्यक्त केली.

ढिगाऱ्याखाली सव्वा किलो सोने व पावणे तीन लाख रुपये
ठाणे: नौपाडा येथील बी केबीन भागातील कृष्णानिवास या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्यांमध्ये तब्बल सव्वा किलो सोने आणि पावणे तीन लाखांची रोकड सापडली असून नौपाडा पोलिसांनी हा ऐवज संबंधितांच्या नातेवाईकांना देण्यास सुरूवात केली आहे. तसेच इमारतीच्या मातीचा ढिगाऱ्यामध्ये आणखी दागिने आणि रोकड असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कॅडबरी जंक्शन येथील एका मैदानात टाकण्यात आलेल्या इमारतीच्या डेब्रीजची शुक्रवारी दुपारी पुन्हा छाननी करण्यात येणार असून त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आहे का नाही, याचा शोध घेण्यात येणार आहे.