अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई व ठाणे परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल २६० कोटी रुपयांचा डाळी व कडधान्यांचा साठा जप्त केला. याप्रकरणी साठेबाज व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर डाळीचे साठे करून ठेवल्यामुळे विविध प्रकारच्या डाळींचे, विशेषत तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यावरून जनक्षोभ उसळू लागल्याने सरकारने साठेबाजांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या चार-पाच दिवसांत मोठय़ा प्रमाणावर छापे टाकून डाळीचे साठे जप्त करण्यात येत आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने डाळी व कडधान्यांच्या साठवणुकीवर कडक र्निबध लागू केले आहेत. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाने साठेबाजांवर कारवाई करण्याचे सर्व शिधावाटप नियंत्रक व जिल्हा पुरवठा कार्यालयांना आदेश दिले. त्यानुसार १९ ते २४ ऑक्टोबर या दरम्यान ३७ गोदामांवर छापे टाकून २६० कोटी रुपये किमतीची डाळ व कडधान्यांचा साठा जप्त केला. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
