देशभरात शुक्रवारी मध्यरात्री वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे पाच मोठे आणि विविध ठिकाणी असलेले ६५ जकात नाके बंद करण्यात आले . पालिकेच्या जकात नाक्यांवर शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ६२ कोटी ४५ लाख ७७ हजार १०६ रुपये जकातीपोटी जमा झाले. तर शुक्रवारी कागदपत्रांची पूर्तता करू  न शकलेले सुमारे ७० ट्रक, तर दक्षता विभागाने जकात चुकवून पळताना पकडलेली सुमारे १५० वाहने नाक्यांवरच आहेत. या सर्वाकडून आणखी सुमारे दोन कोटी रुपयांची भर पालिकेच्या तिजोरीत पडू शकेल असा अंदाज पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये विविध प्रकारचा माल घेऊन येणाऱ्या मालवाहू गाडय़ांची पालिकेच्या पाच मोठय़ा आणि ६५ लहान जकात नाक्यांवर तपासणी करून जकात कर वसूल करण्यात येत होता. जकातीपोटी पालिकेला १ एप्रिल ते ३० जून २०१७ या तीन महिन्यांमध्ये १५०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात या तिमाहीत पालिकेला जकातीपोटी १८६४ कोटी रुपये मिळाले. तसेच अखेरच्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी मध्यरात्रीपर्यंत तब्बल ६२ कोटी ५४ लाख ७७ हजार १०६ रुपये जकात पालिकेच्या तिजोरीत जमा झाली.

जकात नाक्यांवर शुक्रवारी मोठय़ा प्रमाणावर मालवाहू वाहने आली होती. त्यापैकी सुमारे ७० मालवाहू वाहनांचे चालक आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी ही वाहने जकात नाक्यांमध्येच थांबविली होती.

वाशी जकात नाक्यावर वाहतूक कोंडी

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील खड्डेयुक्त रस्ता आणि मानखुर्द जकात नाक्यावर रात्री थांबलेल्या ट्रक टेम्पोंनी सकाळी एकाच वेळी आगेकूच केल्यामुळे वाशी टोल नाक्यावर संध्याकाळपर्यंत  वाहतूक कोंडी झाली होती. विशेष म्हणजे एक जुलैपासून जकात रद्द होऊन लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर प्रणालीचा काही समाजकंटकांनी ट्रक-टेम्पोवाल्यांकडून खासगी जकात वसुली करून फायदा उठविल्याचे समजते.

मानखुर्द ते पनवेलदरम्यान तीन वर्षांपूर्वी पुनर्बाधणी केलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संततधार सुरू झालेल्या पावसात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावर करण्यात येणारी डागडुजी जोरदार पावसात अपुरी पडत आहे.

मानखुर्द येथील मुंबई जकात नाका रद्द करण्यात आला, मात्र रात्री येथील पार्किंग क्षेत्रात गाडी थांबवून सकाळी मुंबईत जाणाऱ्या ट्रक-टेम्पोवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जकात न भरता गाडी मुंबईत नेण्याबद्दल हे वाहतूकदार अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या या अज्ञानाचा फायदा या भागात दलाली करणारे व काही समाजकंटकांनी उचलला. त्यांनी मुंबईत जाणाऱ्या वाहतूकदारांकडून जकात वसूल केली. यात काही पक्षांचे कार्यकर्तेदेखील होते. एपीएमसीत शेतमाल न उतरविता मुंबईत थेट माल नेणारे अनेक ट्रक-टेम्पो आहेत. त्यांनाही या खासगी जकातीला सामोरे जावे लागले. ही जकात शंभर रुपयांपासून ते एक रुपयापर्यंत होती. या खासगी जकात वसुलीमुळे रस्त्यावर काही वाहने अडवली जात होती. त्याचा परिणाम मुंबईत जाणाऱ्या वाहतुकीवर झाला. त्यामुळे संध्याकाळपर्यंत वाशी ते मानखुर्द या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.