म्हाडा संकुलात तलाव, व्यायामशाळा

वांद्रे-कुर्ला संकुलातील म्हाडाच्या भूखंडावरील प्रकल्पापासून त्याची सुरुवात केली जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निशांत सरवणकर

सर्व सुविधांनी सुसज्ज गृहसंकुले; प्रकल्पांचा ‘ठोकळेबाज चेहरा’ बदलण्याचा प्रयत्न

म्हाडा प्रकल्पांची आतापर्यंत असलेली ‘सरकारी गृहनिर्माणा’ची प्रतिमा मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार असून यापुढील प्रकल्पात रहिवाशांना खासगी विकासकांप्रमाणेच जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्लब आदी अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील म्हाडाच्या भूखंडावरील प्रकल्पापासून त्याची सुरुवात केली जाणार आहे.

परवडणाऱ्या घरांची अधिकाधिक निर्मिती करण्यावर भर देतानाच अशा गृहसंकुलांतील रहिवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. म्हाडा सध्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भारतनगर संक्रमण शिबीर आणि वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पात फक्त उच्च उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे खासगी विकासकांशी स्पर्धा करणारी असली तरच या घरांची विक्री होईल, याची कल्पना असलेल्या म्हाडाने या प्रकल्पात प्रत्येक घराचे आकारमान १३०० ते १४०० चौरस फूट इतके निश्चित केले आहे.

या ठिकाणी दोन उत्तुंग टॉवर बांधण्यात येणार असून जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्लब, गार्डन आदी सुविधा पुरविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

याशिवाय गोरेगाव पूर्वेतील पहाडी परिसर तसेच गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगर या अनुक्रमे १८ व ५५ एकर भूखंडांवर पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचेही म्हाडाने ठरविले आहे. हा पुनर्वसन प्रकल्प राबविताना खासगी विकासकाला सहभागी करून घ्यायचे नाही, असे म्हाडाचे धोरण आहे. मात्र या भूखंडावर फक्त उच्च उत्पन्न गट नव्हे तर मध्यम व अल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यात येणार आहेत.

या सर्वच रहिवाशांना म्हाडा प्रकल्पात सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. हे सर्व प्रकल्प अत्याधुनिक पद्धतीने खासगी विकासकांप्रमाणेच राबविण्यात येणार आहेत.

म्हाडा प्रकल्पांचा ‘ठोकळेबाज चेहरा’ बदलण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी सांगितले. फक्त उच्च उत्पन्न गटच नव्हे तर म्हाडाच्या सर्व रहिवाशांना सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

किंमत तीन ते चार कोटी

वांद्रे-कुर्ला संकुलात दोन उत्तुंग टॉवर बांधण्यात येणार असून जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्लब, गार्डन आदी सुविधा पुरविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ४४ एकर आकाराच्या या भूखंडावर अशी आलिशान घरे बांधण्यात येणार असून या घरांची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र तीन ते चार कोटी इतकी या घरांची किंमत असू शकते, असे एका म्हाडा अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

म्हाडाकडून आतापर्यंत ज्या पद्धतीने घरांचे बांधकाम केले जात होते, त्यात बदल व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हाडा प्रकल्पांचा पूर्वीचा चेहरामोहरा बदलून खासगी विकासकांच्या तोडीचे प्रकल्प राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. वांद्रे-कुर्ला प्रकल्पात अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

– मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gymnasium pool at the mhada complex