शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आणि हे अमानुष कृत्य लपविण्यासाठी तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून फेकणाऱ्या दत्तात्रय रोकडे (५४) याला ठाणे सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम केली. रोकडेचा गुन्हा गंभीर व घृणास्पद असून हे प्रकरण दुर्मीळातील दुर्मीळ प्रकारात मोडत असल्यानेच त्याची फाशी कायम करण्यात येत आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नवी मुंबईतील कोपरी येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. रोकडे याने केलेला गुन्हा हा गंभीर आणि घृणास्पद तर आहेच, परंतु तो केल्यानंतरही त्याला त्याचा पश्चात्ताप झाल्याचे त्याच्या वर्तनातून कुठे दिसून आलेले नाही. त्यामुळेच त्याला सुधारण्याची संधी देण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. शिवाय यापूर्वीही त्याने असा प्रयत्न केला होता. मात्र त्या मुलीने आरडाओरडा केल्याने ती त्याच्या तावडीतून सुटली होती. या सगळ्या बाबी लक्षात घेता रोकडे हा ‘विकृत मनोवृत्ती’चा असल्याचे स्पष्ट होते. पाच वर्षांची ही मुलगी आपल्याला कुठलाही प्रतिकार करणार नाही हे माहीत असल्यानेच रोकडेने तिला लक्ष्य केले आणि तिच्यावर अमानुष बलात्कार केला आणि नंतर तिची बेदरकारपणे हत्या केली. त्याचमुळे हे प्रकरण दुर्मीळातील दुर्मीळ प्रकारात मोडत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.