केंद्र सरकारने नुकताच करोनाच्या Delta Plus Variant चा समावेश Variant of Concern या श्रेणीमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सापडणारे डेल्टा प्लसचे रुग्ण हा केंद्रीय आरोग्यम विभागासाठी काळजीचा विषय ठरला आहे. देशभरात आत्तापर्यंत जवळपास ४० करोना रुग्णांमध्ये डेल्टा प्लस हा करोनाचा प्रकार आढळला असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २१ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्रानं महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली जात आहे, याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Delta Plus चे गुणधर्म गंभीर

राजेश टोपे यांनी राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण असल्याची माहिती दिली. मात्र, त्याचवेळी हा इतक्या गंभीर पातळीवर वाढला नसल्याचं सांगितलं. “आपण प्रत्येक जिल्ह्यातून दर आठवड्याला काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत ३४०० नमुन्यांपैकी २१ केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्याचं प्रमाण ०.००५ असं सापडलं आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट अजून इतक्या गंभीर पातळीवर वाढलेला नाही. काळजीचा विषय नसला, तरी त्याचे गुणधर्म मात्र गंभीर आहेत. त्यासाठी या सर्व २१ केसेसचं विलगीकरण आपण करतो आहोत. त्यांचं निरीक्षण केलं जात आहे. त्यांच्या बाबतीत काँटॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सविस्तरपणे सुरू आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

…म्हणून Delta Plus जास्त गंभीर!

दरम्यान, डेल्टा प्लसच्या कोणत्या गुणधर्मांमुळे तो डेल्टापेक्षा जास्त धोकादायक आहे, याविषयी देखील राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली. “डेल्टा प्लस व्हेरिएंट राज्यात जवळपास ७ जिल्ह्यांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रात त्याची एकूण रुग्णसंख्या २१ इतकी आहे. आता डेल्टा प्लस काळजीचं कारण झाला आहे. याचा अर्थ त्याचा फैलाव होण्याचा वेग, संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचा धोका देखील जास्त असू शकतो. त्याशिवाय शरीरातल्या अँटिबॉडीजचा प्रभाव कमी करण्याचा गुणधर्म डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये पाहायला मिळतो आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “डेल्टा प्लसचा अभ्यास सुरू आहे. सुदैवाने डेल्टा प्लसमुळे एकही मृत्यू झालेला नाही. केंद्राला ही माहिती पाठवण्याची कार्यवाही करत आहोत”, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

Delta Plus Variant : “तातडीने पावलं उचला”, केंद्राचा महाराष्ट्रासह ३ राज्यांना इशारा!

महाराष्ट्रासह ३ राज्यांना केंद्राचा इशारा!

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारतात डेल्टा प्लसचे आत्तापर्यंत ४० रुग्ण सापडले आहेत. मात्र, या ४० पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात आत्तापर्यंत २१ डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health minister rajesh tope on delta plus cases in maharashtra variant of concern pmw
First published on: 23-06-2021 at 19:43 IST