मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयासंदर्भात गुरुवारी राज्याचे ‘लोकायुक्त’ यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासदंर्भात तक्रार दिलेली आहे. फेब्रुवारी महिन्यात दमानिया यांनी पुराव्यांसह लेखी तक्रार ‘लोकायुक्त’ यांच्याकडे नोंदवली होती.

मुंडे यांनी कृषी मंत्री असताना वस्तुंच्या किंमती वाढवून खरेदी करत खरेदीत मोठा गैरव्यवहार केला. तसेच त्यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे संचालक असलेल्या ‘व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीअल’ आणि ‘टरटाईल लॉजिस्टीक्स’ या दोन कंपन्यांनी परळीच्या औष्णीक केंद्राची राख उचलून ती खुल्या बाजारात विक्री केली. लाभाच्या पदाच्या (ऑफीस ऑफ प्रॉफीट ) तरतुदीचा मुंडे यांनी नियमभंग केला आहे, असा दमानिया यांनी अर्जात आरोप केलेला आहे.

नोटीस बजावली यासंदर्भातली एक सुनावणी पार पडलेली आहे. दुसरी सुनावणी गुरुवारी ऑनलाईन आहे. त्या सुनावणीला राज्याचे मुख्य सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, राज्य यंत्रमाग महामंडळ आणि कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांना सुनावणीला सहभागी होण्यासंदर्भात लोकायुक्त कार्यालयाने नोटीस बजावली आहे.