मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर शनिवारी हैराण झाले होते. दरम्यान, रविवार आणि सोमवारी उष्ण, तसेच दमट वातावरण असेल. त्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात प्रचंड उकाडा सोसावा लागेल.

राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांत सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुंबईत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडा कायम आहे. उष्म्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३४.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, सोमवार आणि रविवारी मुंबईत अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी रात्री पावसाचा शिडकावा झाला. यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर असह्य उकाड्याने मुंबईकर त्रस्त झाले होते.

हेही वाचा >>>पसंतीच्या वाहन क्रमांकाच्या वितरणातून वडाळा आरटीओच्या तिजोरीत ३० लाख रुपये महसूल जमा

हवामान विभागाने जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागात रविवारी विजा आणि गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच रविवारपासून पुढील चार ते पाच दिवस विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात ढगाळ वतावरणासह कडक ऊन असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.