पाऊस म्हणजे.. वाहतूक कोंडी!

घाटकोपर-अंधेरी मार्गावर साकीनाका परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

सर्व प्रमुख रस्त्यांवर पाणी साचून वाहनांचा खोळंबा; ‘खड्डेमुक्त मुंबई’चा पालिकेचा दावा पुन्हा खोटा
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर सोमवारी दिवसभर कायम राहिल्याने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुंबई महापालिकेने केलेला ‘खड्डेमुक्त मुंबई’चा दावाही किती फोल आहे, हे या तीन दिवसांच्या पावसाने दाखवून दिले. शनिवार आणि रविवार घरात बसून किंवा कुटुंब वा मित्रांसह बाहेर भटकून पावसाची मजा लुटणाऱ्या मुंबईकरांना या पावसाची सजा सोमवारी मिळाली.
सकाळी नऊच्या सुमारास शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले आणि मुंबईकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दुपारी उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती. संध्याकाळी कामाच्या ठिकाणाहून घरी निघालेल्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. या वाहतूक कोंडीमुळे नेहमीचे तासभराचे अंतर कापण्यासाठी मुंबईकरांना दोन ते अडीच तासांचा अवधी लागत होता.
घाटकोपर-अंधेरी मार्गावर साकीनाका परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील डी. एन. रोडवरही दुपारच्या वेळी वाहनांची दाटी झाली होती. बेस्ट बसगाडय़ा, टॅक्सी, खासगी वाहने आणि त्यातच शाळा सुटण्याच्या वेळी दिसणाऱ्या स्कूल बसच्या गर्दीमुळे सीएसटी ते चर्चगेट हे दहा मिनिटांचे अंतर जाण्यासाठी २० ते २५ मिनिटांचा अवधी लागत होता. संध्याकाळीदेखील हीच परिस्थिती होती. जे. जे. उड्डाणपूल, हिंदमाता परिसर, खोदादाद सर्कल, टिळक पूल, जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, आरे वसाहत रस्ता या भागांतही हेच चित्र होते, तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने या कोंडीत भर पडली. सकाळच्या वेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मुंबईत येण्यासाठी नेहमीपेक्षा एक ते दीड तास जास्त लागत होता. त्यातच सर्वच रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे असल्याने वाहनांच्या अडथळ्यांमध्ये भर पडत होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही..
दरवर्षी मुंबईत रस्ते पाण्याखाली जाण्याच्या काही जागा ठरलेल्या आहेत. याता हिंदमाता, स्वामी विवेकानंद रोडवरील काही ठिकाणे, मिलन सबवेजवळील परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्गावरील मुलुंड-भांडूप येथील परिसर यांचा समावेश आहे. या ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक हळूहळू सुरू होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे पावसाळ्याच्या दिवसांत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने मुंबईकर हैराण झाले होते.

काही नवी ठिकाणे
गेल्या दोन-तीन वर्षांत मुंबईतील रस्त्यांचे अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल, असे चित्र रंगवण्यात आले होते. मात्र या सर्वच प्रकल्पांच्या आसपास प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता कुल्र्याच्या बाजूला उतरतो, त्या ठिकाणापासून थेट कलिना विद्यापीठापर्यंत सोमवारी रस्ते वाहनांनी भरले होते. तर, हा रस्ता पूर्व द्रुतगती महामार्गाला लागतो, तेथेही वाहनांची कोंडी झाली होती. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून सहार उन्नत मार्गाला लागण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला आहे. तेथे जाण्यासाठीही वाहनांच्या रांगा होत्या. पूर्व मुक्तमार्गामुळे मुंबईकरांना दक्षिण मुंबईत पोहोचणे सुसह्य़ झाले असले, तरी पूर्व मुक्तमार्ग संपल्यानंतर मुंबईच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागतात. संध्याकाळी मुक्तमार्गाच्या दिशेने या रांगेचे तोंड असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rain in mumbai create huge traffic deadlock