मुंबई : राज्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आठ लाख ५१ हजार ११० हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. अनेक भागात पिके पाण्याखाली आहेत. नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारीही पाऊस सुरूच असल्यामुळे पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली नव्हती. राज्यभरामध्ये दरड कोसळून तसेच पुरात वाहून गेल्याने आणि अन्य घटनांमध्ये एका दिवसात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १८ ऑगस्टपर्यंत राज्यात आठ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीसह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये संत्रा बागांना फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी या तालुक्यांमध्ये मूग, सोयाबीन, उडीद, मका, ज्वारी आणि फळपिकांचे अंदाजे दोन लाख ८५ हजार ५४३ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि मानोरा तालुक्यांतील एक लाख, ६४ हजार ५५७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत तर वाशिम, हिंगोली आणि मानोरा तालुक्यात २४६ हेक्टर जमीन अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने खरवडून गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बाबुळगाव, मालेगाव, मोहगाव आणि यवतमाळ तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर या पिकाखालील ८० हजार ९६९ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. अकोल्यात सोयाबीन आणि तूर, सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन, तूर , मूग, उडीद, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली येथील हळद पिकाचे तसेच कापसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबईमध्ये झाड पडल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी झाला. नांदेडमध्ये पुरात वाहून गेल्याने चार जणांचा मुंबई शहरामध्ये भिंत पडल्याने दोन, सिंधुदुर्गमध्ये बुडून दोघांचा रायगडमध्ये दरड कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाला. राज्यात एनडीआरएफ च्या १८ तर एसडीआरएफची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.

पंचनामे करून अहवाल द्या: अजित पवार

अतिवृष्टीमुळे पिके, घरांची हानी किंवा अन्य प्रकारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवावेत, असे निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. पवार यांनी मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

७८ तालुक्यांत नुकसान

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांतील ७८ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.