मुंबई / ठाणे :  मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांतील बहुतांश भागाला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. संध्याकाळी एक तासाच्या पावसातच ठाणे जिल्ह्यात रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मुंबईत अनेक भागांत तासाभरात ७० मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुढे दोन-तीन तास रेल्वे ठप्प झाली आणि त्याचा ताण रस्ते वाहतूकीवर आला.

घरी परतणारा नोकरदार वर्ग, दर्शनाचा शेवटचा दिवस म्हणून गणेशभक्तांची गर्दी यामुळे गुरुवारी संध्याकाळी  मुंबई अक्षरश: कोंडली. ठाणे जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, आजही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत भांडूप संकूल येथे साधारण ७२ मिमि पावसाची नोंद झाली. याशिवाय ऐरोलीतही ७५ ते ८० मिमि पाऊस नोंदवला गेला. मालाड ते दहिसर भागात एका तासातच ५०ते ६० मिमी पाऊस पडला.

सगळीकडे कोंडी..

ठाणे- बेलापूर मार्गावर कळवा ते विटावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत बसगाडय़ा, रुग्णवाहिका अडकल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड टोलनाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच घोडबंदरसह शहरातील अंतर्गत मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबई- उपनगरात सर्वत्र हीच परिस्थिती होती.

आज रौद्ररूप?

गेल्या दोन दिवसांत पाऊस आणि वीजा अंगावर पडून पाच जणांचा मत्यू झाला असून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आज, शुक्रवारी पावसाचे रौद्र रुप दिसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तासाभराच्या प्रवासासाठी तीन तास

सायंकाळी साधारण ६.३० वाजता सीएसएमटी येथून सुटलेली लोकल ठाण्याला रात्री १० वाजता पोहोचली. ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ‘सीएसएमटी’ स्थानकाकडे येणाऱ्या गाडय़ा खोळंबल्या. परिणामी सीएसएमटी स्थानकातूनही कर्जत, खोपोलीच्या दिशेने गाडय़ा अडकून राहिल्या.

कळव्यात चिमुकला बुडाला..

ठाणे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली .कळवा येथे भास्कर नगर भागात एक घर कोसळले. याच परिसरात  रस्त्यावर सुमारे ४ फूटापर्यंत पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज येऊ शकला नसल्याने आदित्य मोर्या हा चार वर्षांचा मुलगा वाहून गेला. प्रशासनाकडून त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.