मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने रविवारी सकाळी रुद्रावतार धारण केला आणि मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कायम असून, रायगडमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. पुढील आठवडाभर मराठवाडय़ाचा अपवाद वगळता मुंबईसह राज्यभर पावसाच्या सरी सुरू राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. नळबाजार, नाना चौक, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, भायखळा, हिंदमाता, परळ, वांद्रे, मिलन सब-वे, शीव, चेंबूर, टिळकनगर, कुर्ला, घाटकोपरसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अनेक परिसरात पाणी साचले. वडाळा, शीव, कुर्ला, विद्याविहार, ठाणे यासह काही ठिकाणी रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विलंबाने धावत होती. अनेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक कोलमडली. परिणामी, बेस्टच्या बसगाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून मोठय़ा प्रमाणावर नदी-नाल्यांची साफसफाई करण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे नालेसफाईबाबतचे दावे फोल ठरवीत रस्ते जलमय केले. मात्र, सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्याचा फारसा फटका मुंबईकरांना बसला नाही. परंतु काही भागात दीड-दोन फूट पाणी साचले आणि तळमजल्यावरील घरे जलमय झाली. तसेच झोपडपट्टय़ांमध्ये पाणी साचून रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

रायगडमध्ये कर्जत (२३१ मिमी), खालापूर (२२१), महाड (२४४), माणगाव (२५०) या ठिकाणी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे रायगडमध्ये दोन दिवसांत तिघांचा बळी गेला. खालापूर तालुक्यातील इसांबे कातकरी वाडी येथे राहणारे मधुकर डुकरे हे पाय घसरून ओहोळात वाहून गेले. त्यांचा मृतदेह रविवारी मौजे वरद येथे सापडला. दुसऱ्या एका घटनेत पुण्याहून १३ जणांचा एक समूह महाड येथील शिवथर येथे पर्यटनासाठी आला होता. यातील उत्तम हरपाले यांचा धबधब्याखालील डोहात पडून मृत्यू झाला. तिसऱ्या एका घटनेत उरण येथील केगाव येथे तलावात विराज पाटील या तरुणाचा बडून मृत्यू झाला.

मुसळधार पावसामुळे नेरळ माथेरान घाटात रविवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. दुपारनंतर दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

पाण्याच्या प्रवाहात गाडी नाल्यात पडली

अंधेरी सब-वेमध्ये मोठया प्रमाणात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्याच्या प्रवाहात परिसरात उभी करण्यात आलेल्या चार गाडय़ा वाहून गेल्या, तर त्यातील एक गाडी पूर्वेकडील उघडय़ा नाल्यात पडली.

रविवारी दिवसभरातील पाऊस

’ कुलाबा – १४० मिलीमीटर

’ सांताक्रुझ – ६६ मिलीमीटर

’ रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत भिवंडी येथे तब्बल ३८० मिमी पावसाची नोंद झाली असून ती देशात सर्वाधिक आहे.

कुर्ला येथे इमारतीचा भाग कोसळला

कुर्ला पश्चिमेकडील भूषण भुवन या जुन्या इमारतीचा काही भाग रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती पोलीस, अग्निशमन दलाने दिली. या तीन मजली इमारतीत २९ कुटुंबे वास्तव्यास आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains paralyses normal life in mumbai
First published on: 09-07-2018 at 01:01 IST