अनंत गाडगीळ यांच्याकडून आठवणींना उजाळा; करकरे यांच्या मुलीच्या पुस्तकाचे प्रकाशन
हेमंत करकरे हा प्रचंड लोकसंग्रह असलेला माणूस होता. तो एक चांगला कलाकार होता. तो ‘रॉ’मधून परतल्यानंतर रोज आम्ही दोघे मैदानात चालण्यासाठी जायचो. तेव्हा आपल्या जिवाला धोका असल्याचे हेमंतने सांगितले होते. ‘‘२६/११’च्या दोन दिवस आधी हेमंत मला भेटला तेव्हा तो ज्या राष्ट्रीय प्रकरणाचा तपास करत होता, त्याविषयी उद्विग्नपणे बोलत होता,’’ अशी आठवण दहशतवाद विरोध पथकाचे माजी प्रमुख शहीद हेमंत करकरे यांचे मित्र वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी सांगितली.
करकरे यांची कन्या जुई करकरे-नवरे यांनी लिहिलेल्या ‘हेमंत करकरे – अ डॉटर्स मेमॉयर’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पत्नी आदिती पडसलगीकर यांच्या हस्ते सोमवारी पोलीस क्लब येथे झाले, त्या वेळी गाडगीळ बोलत होते.
हेमंत शहीद होण्याच्या आधी एकदा आमची भेट झाली होती. मी त्याला चहा घ्यायला सांगितले. मात्र तो घाईत असल्याने चहा न घेताच गेला. मी त्याला म्हटलेही की, कोणी चहा देत असेल तर नाकारू नये. पुन्हा कधी एकत्र चहा घेता येईल, माहीत नाही. तसेच झाले. हेमंतसोबत शेवटचा चहा घ्यायचे राहूनच गेले, अशी आठवण निवृत्त पोलीस अधिकारी के. एल. प्रसाद यांनी सांगितली.
माझे वडील चंद्रपूरला अधीक्षक असताना त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधायला सुरुवात केली. यातून त्यांनी लोकांवरचा पोलिसांवरचा विश्वास वाढवला. पप्पांचे अस्तित्व सगळीकडे आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते जाणवते. ते कसे गेले यापेक्षा ते कसे जगले हे सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे, असे जुई करकरे-नवरे म्हणाल्या.
सत्य शोधणारा अधिकारी – रिबेरो
तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही लोक तुमच्याबद्दल चांगले बोलतात, म्हणजे तुम्ही चांगले अधिकारी आहात. हेमंतला भेटलेला प्रत्येक जण त्याच्याबद्दल चांगलेच बोलतो. सत्य शोधून काढण्याची आणि त्यालाच चिकटून बसण्याची हेमंतची वृत्ती होती, असे निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो म्हणाले.