मुंबई : ‘कार्डेलिया’ क्रुझवरील पार्टीवर करण्यात आलेली कारवाई सध्या चर्चेत असतानाच मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शीव परिसरातून २१ कोटी रुपये किमतीचे सुमारे सव्वासात किलो हेरॉइन जप्त केले. याप्रकरणी एका वितरक महिलेला अटक करण्यात आली. एएनसीने वर्षभरात १६ किलो हेरॉइन जप्त केले असून त्याची किंमत ४४ कोटी रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थान येथील चितौडगड, प्रतापगड येथे अफूची शेती करणाऱ्या टोळय़ा रेल्वे, बस व कुरियरमार्गे मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थाची तस्करी करीत असून त्यांनी मुंबईतही हेरॉइनचा साठा पाठवल्याची माहिती घाटकोपर एएनसीला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांना अशा टोळय़ांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. या टोळय़ांचा माग घेतला असता सुतार यांना शीव कोळीवाडा येथील वडाळा ट्रक टर्मिनस रोडवरील न्यू ट्रांझिट कॅम्प येथील पदपथावर मंगळवारी एक महिला अमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमिना हजमा शेख ऊर्फ लाली (५३) हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून सात किलो २०० ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले.

लाली मुंबई व आसपासच्या परिसरात हेरॉइनची विक्री व वितरण करीत होती. चौकशीत तिने हे अमलीपदार्थ राजस्थानमधील प्रतापगड येथील देवलदी, नौगमामधील दोन व्यापाऱ्यांकडून घेतल्याचे सांगितले आहे. आरोपी महिला हेरॉइन विक्रीत सराईत असून यापूर्वी २०१५ व २०१८ मध्ये तिच्याविरोधात हेरॉइन विक्रीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून २०१५ मध्ये ५० ग्रॅम हेरॉइन व २०१८ मध्ये २५ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले होते. 

एएनसीने २०२१ मध्ये हेरॉईन विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाई करून आठ गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या आठ गुन्ह्यांमध्ये १६ किलो हेरॉईन मुंबई पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत ४४ कोटी रुपये आहे.

अंधेरीतून एमडी जप्त

एएनसीने केलेल्या आणखी एका कारवाईत मुंबईतील अंधेरी परिसरातून मेफ्रेडोनसह दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून १६० ग्रॅम मेफेडॉन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १६ लाख रुपये आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (४४) व अब्दुल्लाह शेख (२९) या दोघांना अटक करण्यात आली. अल्ताफ हा सराईत अरोपी असून त्याच्याविरोधात मारहाण, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०१९ मध्ये दोन वर्षांकरता मुंबईतून तडीपार करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heroin worth rs 21 crore seized from sion zws
First published on: 21-10-2021 at 01:53 IST