राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर पंखे, वातानुकूलन यंत्रणेचा वापर वाढल्याने वीजमागणी वाढली असून ५ ऑक्टोबर रोजी ‘महावितरण’ने वीजपुरवठय़ाचा नवा उच्चांक प्रस्थापित करत ३६४.५७ दशलक्ष युनिट वीज राज्याला पुरवली. आतापर्यंत वीजपुरवठय़ाचा उच्चांक २९ सप्टेंबर रोजी झाला होता. त्या दिवशी ३६२ दशलक्ष युनिट वीज पुरवठा झाला होता. सप्टेंबरच्या शेवटच्या तीन-चार दिवसांत पारा चांगलाच चढला. विक्रमी तापमान त्या काळात नोंदले गेले. आता ‘ऑक्टोबर हीट’मुळे राज्यात उकाडा वाढू लागला आहे. त्याचा परिणाम विजेच्या मागणीवरही झाला आहे. त्यातूनच राज्यात रविवारी वीजपुरवठय़ाचा उच्चांक नोंदला गेला. १ ऑक्टोबरपासूनच राज्यात सतत १६ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज पुरवली जात आहे. भारनियमनाचे प्रमाण १५० मेगावॉट ते ९०० मेगावॉटच्या दरम्यान आहे.