मुंबई : अंधेरीतील सहार मार्गावरील हिल्टन गार्डन इन हॉटेलबाहेर तीन झाडाच्या बुंध्याशी पक्के बांधकाम करण्यात आल्याचे नुकतेच निदर्शनास आले असून त्याबाबत पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. अंधेरीत यापूर्वीही अनेक वेळा झाडांच्या बुंध्याशी काँक्रिटीकरण केल्याच्या घटना घडल्या होत्या.

तसेच, वृक्ष छाटणीदरम्यानही अयोग्य पद्धतीने छाटणी करण्यात आली होती. त्यामुळे अंधेरीतील झाडांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वॉचडॉग फाऊंडेशनने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे.

सहार मार्गावर साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वी हिल्टन गार्डन इन हॉटेल सुरू झाले आहे. त्या हॉटेलच्या परिसरात पूर्ण वाढ झालेल्या तीन झाडांच्या भोवती पक्के बांधकाम करून फरशा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे झाडे सुकण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. झाडांच्या बुंध्याभोवती किमान एक मीटर खुली जागा ठेवणे अनिवार्य असल्याच्या सूचना राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. मात्र, या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्ते काँक्रीटीकरण करताना या नियमाला बगल देत अनेक झाडांच्या बुंध्यालगत काँक्रीटीकरण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी अनेक घटनांमध्ये कंत्राटदारांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता. अंधेरीत अनेक वेळा झाडांच्या आरोग्याशी हेळसांड होत असल्याचा आरोप वॉचडॉग फाऊंडेशनने केला आहे. हिल्टन गार्डन इन हॉटेलच्या परिसरातील झाडे निरोगी, परिपक्व होती. मात्र, झाडांच्या बुंध्याशी सिमेंट काँक्रीटकरण केल्यामुळे त्या झाडांच्या मुळांना आवश्यक हवा, पाणी मिळत नाही. त्यामुळे झाडांची वाढ बाधित झाली आहे.

संबंधित हॉटेलच्या नावातच ‘गार्डन’ हा शब्द आहे, ज्यात निसर्गाप्रती संवेदनशीलता जाणवते. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने काँक्रिटीकरण केले असल्याचा संशय देखील फाऊंडेशनने व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणात उद्यान अधीक्षक किंवा महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.