आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी अनेक वेगवेगळ्या जीवनप्रवासाची साक्षीदार आहे. घरदार नसल्यामुळे रस्त्यावर झोपणारेही तेथे आहेत आणि झोपड्यांचे तीन-चार मजली टॅावर उभारणारे माफियाही आहेत. धारावीची कथा सांगणारी हिंदी वेब मालिका ‘धारावी बॅंक’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘ ३६ गुण’, ‘हुप्पा हुय्या’, ‘हाफ तिकिट’, ‘आयना का बायना’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या समित कक्कड यांची ही वेब मालिका असून त्याची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. एम.एक्स प्लेअर या ओटीटी माध्यमावर १९ नोव्हेंबर रोजी ही वेब मालिका प्रदर्शित झाली आहे.
हेही वाचा >>>मुंबईत ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमने-सामने; विकासकामाच्या श्रेयवादावरून जोरदार घोषणाबाजी
‘धारावी बँक’मध्ये एक वेगळे जग पाहायला मिळेल. आतापर्यंत असंख्य चित्रपटांमध्ये, वेब मालिकांमध्ये गुन्हेगारी विश्व आणि प्रशासनाचा सामना प्रेक्षकांनी पाहिला आहे. पण या दरम्यानच्या अनेक गोष्टी कधीच समोर आल्या नव्हत्या. त्या सर्व बारीकसारीक गोष्टी ‘धारावी बँक’मध्ये पाहायला मिळणार आहेत. धारावीतील आर्थिक व्यवहार कसे चालतात, कशाप्रकारे तेथील व्यवस्था, यंत्रणा सुरू असते, पोलिसांचे खबरी कसे काम करतात, गुन्हेगारी विश्वाचे धागेदोरे कसे ६जोडले आहेत आणि एकूणच मुंबईतील गुन्हेगारी विश्व या वेब मालिकेत उलडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.
हेही वाचा >>>मुंबई: नॅन्सी कॉलनीतील रस्ता अखेर काँक्रीटचा होणार
‘धारावी बँक’मध्ये अभिनेता सुनील शेट्टी आणि विवेक ऑबेरॉय यांची प्रमुख भूमिका असून फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, शांती प्रिया, ल्यूके किनी, वामशी कृष्णन, भावना राव, समीक्षा भटनागर, श्रुती श्रीवास्तव, हितेश भोजराज, पवित्रा सरकार आदी कलाकारांची फौज या वेब मालिकेत आहे. सोनाली कुलकर्णी, जयवंत वाडकर, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, रोहित पाठक, नागेश भोसले हे मराठी कलाकारही महत्वाची भूमिका साकारणार आहेत.