मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी अलीकडेच घातलेल्या टीशर्टवर लिहिलेला “हिंदु” हे शब्द सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या टीशर्टवरील “हिंदु” शब्द हिंदी लिपीमध्ये लिहिलेला असून त्यामध्ये ‘दू’ हा स्वर दीर्घ न लिहिता ‘दु’ असा लिहिला आहे, यामुळे भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीत “हिंदू” असे लिहिताना “दू” हा स्वर दीर्घ असतो. मात्र देशपांडे यांच्या टीशर्टवर तो लघु लिहिल्याचे दिसते. यावर काही समाज माध्यम वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षाच्या नेत्याच्या टीशर्टवरील शब्दाचा उच्चारच चुकीचा का? याबाबत खुद्द संदीप देशपांडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मराठी भाषेच्या शुद्धलेखनाबाबतची ही चर्चा अधिकच गहिरी होताना दिसत आहे.

मराठी अस्मिता आणि टीकेची झोड

मनसे हा मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांच्या नेत्याने घातलेल्या टीशर्टवरील शब्द चुकीच्या प्रकारे लिहिला जाणे हे अनेकांसाठी खटकणारे ठरले आहे. “जे स्वतःला मराठी अस्मितेचे रक्षक म्हणवतात, त्यांनी व्याकरणाकडे दुर्लक्ष करावे का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

भाषिक जाणिवा की फक्त सादरीकरण?

काही वापरकर्त्यांनी हे अनवधानाने झाले असावे असे मानले असले तरी, काहींनी यामागे मराठी भाषेची गळचेपी दर्शवणारा नमुना असल्याचे मत व्यक्त केले आहे. टीशर्ट छापणाऱ्या डिझायनरकडून झालेली चूक असो वा मुद्दाम हिंदी लिपीचा वापर यावरून भाषिक संवेदनशीलतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

भाषिक अस्मिता पुन्हा केंद्रस्थानी

अलीकडच्या काळात समाज माध्यमांवर हिंदी आणि मराठी यांच्यातील भाषिक संघर्ष प्रकर्षाने जाणवतो आहे. विशेषतः मराठी भाषेच्या वापराबाबत नागरिकांमध्ये वाढती जागरूकता दिसून येते, मात्र अनेकदा ही भावना आक्रमक पातळीवर पोहचते.

मराठी भाषिकांचा रोष , मुद्दे आणि मागण्या

– हा महाराष्ट्र आहे. इथे मराठीला प्राधान्य मिळालेच पाहिजे.

– हिंदी लादण्याचा प्रकार सहन करणार नाही

– भाषा म्हणजे फक्त संवादाचे माध्यम नाही, ती अस्मिता आहे.

वाद की अस्मितेचा लढा?

हा केवळ हिंदी-विरोध नाही, तर स्थानिक भाषेचा सन्मान राखावा ही मागणी आहे, असे अनेक सामाजिक भाषिक संघटनांचे म्हणणे आहे. विशेषतः तरुण वर्ग भाषेच्या बाबतीत अधिक जागरूक झाला आहे.