मुंबई : नांदेड, अमरावती, मालेगाव येथे दुसऱ्या दिवशी झालेला हिंसाचार ही हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे केले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपचे कधी येईल, याची वाट न पाहता सक्षम व प्रभावी विरोधी पक्ष म्हणून लढा देण्याचे आवाहन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात पाटील बोलत होते. यावेळी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकिया, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेश सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे आणि जयभानसिंह पवय्या, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आदी उपस्थित होते.

उद्घाटन सत्रात बोलताना पाटील म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. राज्यात सामूहिक बलात्काराच्या दु:खदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही. त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली झाल्या. त्यासाठी १५-२० हजार लोक रस्त्यावर आले व पोलिसांवर हल्ला केला. याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली, तरीही भाजपवर आरोप केला जातो. हिंदू मार खाण्यासाठी नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. पहिल्या दिवशीची दंगल मुस्लिमांनी घडविली व दुसऱ्या दिवशी हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.  हिंदूूंच्या प्रतिक्रियेसाठी भाजप जबाबदार असेल, तर पहिल्या दिवशीच्या दंगलीस शिवसेना जबाबदार होती का, असा सवालही त्यांनी केला. अमली पदार्थाचे समर्थन केले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही स्थिती झाली असल्याने आपल्याला संघर्ष चालू ठेवावा लागेल.

हिंमत असेल तर निवडणुका घ्या

राज्यातील जनतेने २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मते दिली. पण शिवसेनेने विश्वासघात केला. आता राज्याला अर्धवेळ (पार्टटाईम) मुख्यमंत्री आहेत. हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्या, भाजप निवडणूक जिंकेल, असे आव्हान प्रभारी सी. टी. रवी यांनी दिले.

माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

हा तर लोकशाहीवरचा हल्ला

मुंबईवर झालेल्या २६/ ११च्या अतिरेकी हल्ल्याच्या घटनेप्रमाणे  २८/११ ची महाविकास आघाडी सरकार स्थापनेची घटना हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचा आरोप माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांला मुख्यमंत्री करीन, असे वचन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना दिले होते, असे सांगितले. पण सत्तेच्या लोभामुळे तेच या पदावर आले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना वचन दिले, याचे साक्षीदार कोण, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांसह सर्वच समाजघटकांची फसवणूक केल्याची टीका मुनगंटीवार यांनी राजकीय ठराव मांडताना केली.