या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन ते अर्वाचीन

मानवी आयुष्यात मीठाला सर्वाधिक महत्त्व आहे. पिण्यायोग्य पाणी आणि मीठ हे मानवी जीवनासाठीचे दोन महत्त्वाचे अत्यावश्यक घटक आहेत. यांची उपलब्धता प्राचीन काळी कुठे होती, यावरून पुरातत्त्वज्ञ अनेकदा प्राचीन काळातील मानवी वस्तींचा शोध घेत असतात. अश्मयुगीन हत्यारेही अशाच ठिकाणी सापडली आहेत, जिथे या दोन्हींचा आढळ आहे अथवा होता. होता एवढय़ाचसाठी कारण जमिनीच्या वापरामध्ये झालेल्या बदलामुळे तर काही ठिकाणी शतकानुशतकातील नैसर्गिक घडामोडींमुळेही अनेक बदल भूरचनेमध्ये प्रस्तुत कालखंडामध्ये झालेले असू शकतात. मुंबईच्या संदर्भात याचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, प्राचीन काळापासून मुंबईचा थेट संबंध हा इथे किनारपट्टीवरील मीठागरांशी राहिला आहे. अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईतील मीठागरांवर मिठाचे उत्पादन अव्याहत सुरू होते. किंबहुना हा मुंबईतील सर्वात प्राचीन व्यवसाय आहे. याची तुलना प्राचीन काळापासून सुरू असलेल्या मासेमारीशीच केवळ केली जाऊ शकते. मात्र मिठाच्या उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे मासेमारीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कैकपटीने अधिक आहे. मासे हे नाशवंत तर मीठ दीर्घकाळ टिकणारे व जीवनावश्यक असा हा भेद आहे. त्यामुळेच मुंबईचा विचार करताना या मीठागरांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राचीन काळापासून प्राप्त झाले. अनेक शतकांमध्ये इथे होऊन गेलेल्या राजसत्तांनाही म्हणूनच मुंबई हवी होती. पोर्तुगीजांप्रमाणेच ब्रिटिशांनीही मुंबईमधून मोठय़ा प्रमाणावर मिठाच्या उत्पादनातून महसूल गोळा केल्याच्या कागदोपत्री नोंदी उपलब्ध आहेत. पोर्तुगीजांनी वसई परिसर आणि साष्टी बेटावर म्हणजेच भाईंदर ते वांद्रे परिसरावर राज्य केले. इथेही मीठ हेच प्रमुख उत्पादन होते. आजही मुंबईमध्ये तब्बल ५३७९ हेक्टर तर वसई आणि पालघर परिसरांत प्रत्येकी दोन हजार हेक्टर मीठागरांची जमीन आहे.

मिठाच्या या उत्पादनासाठी कारण ठरली ती मुंबईच्या किनारपट्टीवरील भूरचना. या संदर्भात भूगर्भतज्ज्ञ डॉ. रोहिंग्टन आवासिया सांगतात, ‘‘मीठागरे तयार होण्यासाठी विशिष्ट प्रकारची भूरचना गरजेची असते. समुद्राजवळच्या जमिनीचा उतार जिथे सर्वाधिक १० टक्क्यांपर्यंत असतो आणि त्याची व्याप्ती ही नदीपात्राप्रमाणे अतिविस्तीर्ण असते, अशाच ठिकाणी मीठागरांसाठी सुयोग्य जमीन तयार होते. मुंबईत पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्टींवर अशा प्रकारे मीठागरांसाठी सुयोग्य जमिनीची निर्मिती झालेली दिसते.’’ मुंबईच्या पूर्वेकडे अगदी वडाळ्यापासून ते ठाण्यापर्यंत आणि पश्चिमेकडे वांद्रा- खारदांडा पासून ते भाईंदपर्यंत मोठय़ा प्रमाणावर मीठागरे पसरलेली दिसतात. त्यातही गोरेगावच्या पुढे थेट भाईंदपर्यंत ती सलग पाहता येतात. भांडुपच्या बाजूने आतमध्ये शिरणारा खाडीचा भाग तर अगदी पार आजच्या पवईपर्यंत आतमध्ये येत होता. खुद्द पवईमध्ये ४४४ हेक्टर मीठागरांची जागा होती, असे आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. पण मुंबईतील मीठागरे आयुक्तांच्या कार्यालयामध्ये याच्या नोंदी आजही पाहायला मिळतात.

पूर्वेच्या बाजूस माहूलच्या खाडीने तुभ्रे बेटाला वेगळे केले होते. तुर्भे बेट हे तर चहुबाजूंनी असलेल्या मीठागरांसाठी प्रसिद्ध होते. भाभा अणू संशोधन केंद्राची (बीएआरसी) निर्मिती होण्यापूर्वीपर्यंत इथे खूप मोठय़ा प्रमाणावर मीठागरे अस्तित्वात होती. म्हणूनच तुभ्र्याच्या एका टोकाला आजही मीठागरे आयुक्तांचे कार्यालय पाहायला मिळते. गेल्याच वर्षी साष्टी बेटाचे गवेषण करणाऱ्या मुंबई विद्यापीठातील बहि:शाल शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांना बीएआरसीमध्ये १४व्या शतकातील राजा हंबीरराव याचा शिलालेख सापडला. त्यामध्ये उल्लेख असलेले नानाळे गाव हे खारग्राम म्हणून प्रसिद्ध होते. याच शिलालेखामध्ये असलेला खावेंग्रामु हा उल्लेख याच खारग्रामाचा असावा, असा अंदाज आहे. येथे तत्कालीन राजाने दान केलेली जमीन ही खारजमीन असावी आणि म्हणूनच ती राजाने दान दिलेली असल्याने त्यावरील महसुलावर करसंकलन करण्यात येऊ नये, अशी राजाज्ञा त्या शिलालेखामध्ये उल्लेखिली असावी. महिकावतीच्या सुप्रसिद्ध बखरीमध्येही मिठाच्या उत्पादनातून येणाऱ्या उत्पन्नाचा उल्लेख सापडतो. त्यावरून असा अंदाज बांधता येतो की, मुंबई परिसरामध्ये मध्ययुगामध्ये झालेल्या अनेक लढाया किंवा युद्ध हे येथून मिळणाऱ्या मिठाच्या मोठय़ा महसुलावरून झालेली असावीत. कारण एरवी तत्कालीन मुंबई आपल्या ताब्यात असावी, असे वाटण्यासारखे या मुंबईमध्ये काहीही नव्हते. अपवाद हा तत्कालीन शूर्पारक (आताचे नालासोपारा) या मोठय़ा बंदराचा. त्यामुळे अगदी प्राचीन कालखंडापासून ते अर्वाचीन काळापर्यंत मुंबईच्या सत्ताकारणाच्या केंद्रस्थानी मीठ होते आणि मुंबईची भूरचना ही त्यासाठी महत्त्वाचे कारण ठरली, असे लक्षात येते.

मुंबईतील विक्रोळीचे नावही विखरवल्ली म्हणजे विकार असलेली किंवा क्षारयुक्त जमीन यावरूनच अस्तित्वात आले आहे. विक्रोळीमध्ये मीठागरांचा मोठाच पट्टा पाहायला मिळतो. आता मात्र या विद्यमान सरकारला मीठागरांची जमीन ताब्यात घेऊन तिथे गरिबांसाठी स्वस्तातील घरे बांधावयाची आहेत. मात्र त्यामुळे बशीच्या आकाराच्या मुंबईला लाभलेला मीठागरांच्या जमिनींचा हा भरतीच्या काळातील नैसर्गिक बफर झोन नष्ट होण्याची शक्यता आहे. याचे परिणाम तुफान पावसात आलेल्या भरतीच्या वेळेस भोगावे लागतील. कारण त्या वेळेस पाण्याच्या निचऱ्यासाठी किंवा अधिकचे पाणी पकडून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन आपण गमावलेली असेल, असे भूरचनातज्ज्ञांना वाटते!

विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of salt pan lands in mumbai
First published on: 07-02-2018 at 02:19 IST