मुंबई : होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार करण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सामान्यांच्या आयुष्याशी खेळणारा आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये चुकीचे औषधोपचार, चुकीचे निदान होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होईल. तसेच डॉक्टरांची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचा आक्षेप घेत राज्य सरकारच्या या निर्णयाला वैद्याकीय क्षेत्रातून विरोध करण्यात येत आहे. त्याबाबत नियमावली केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेच्या प्रशासकांनी नमूद केले.
ग्रामीण भागात अॅलोपॅथिक शाखेतील डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा देता यावी, यासाठी एक ब्रिज कोर्स तयार करून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टराला अॅलोपॅथीमध्ये सराव करण्याची तसेच महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेमध्ये स्वतंत्रपणे नोंदणी करण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. त्यासंदर्भात आयएमएने न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र आता अंमलबजावणी करण्याची सूचना राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेला दिल्याने, १५ जुलैपासून हा कोर्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील अॅलोपॅथी डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अॅलोपॅथीचा सराव करणारे होमिओपॅथी डॉक्टर हे सहा महिन्यांच्या ब्रिज कोर्सद्वारे अपुरे ज्ञान घेऊन नागरिकांचे जीव धोक्यात घालतील. त्यामुळे हा प्रकार धोकादायक आहे. तसेच ज्या रुग्णांना होमिओपॅथी डॉक्टर हवे आहेत त्यांना शुद्ध होमिओपॅथी करणारे डॉक्टर मिळणार नाहीत, असे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सचे माजी अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी सांगितले.
अॅलोपॅथीला विरोध म्हणून होमिओपॅथी या शास्त्राचा उगम झाला. त्यामुळे सरकारचा हा निर्णय होमिओपॅथीच्या मुळावरच घाव घालणारा आहे. होमिओपॅथीमधील औषधे आणि अॅलोपॅथीची औषधे यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे हा निर्णय अयोग्य असून, यातून होमिओपॅथी डॉक्टरांबरोबरच रुग्णांचेही नुकसान होणार आहे. अॅलोपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना आठ वर्षे अभ्यास करूनही अनेक बारकावे समजण्यास अवघड जाते. होमिओपॅथी डॉक्टरांकडून चूक झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न हीलिंग हॅंड्स युनिटीचे समन्वयक डॉ. तुषार जगताप यांनी उपस्थित केला आहे.
ब्रिज कोर्स पूर्ण केल्याने अॅलोपॅथीचा सराव करता येणार असेल तर कोणीही व्यक्ती ब्रिज कोर्स करून अॅलोपॅथीची डॉक्टर होऊ शकते. यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सरकारकडून करण्यात येत असल्याचे डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.
लवकरच मार्गदर्शक तत्त्वे….
ब्रिज कोर्स पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना पूर्णपणे अॅलोपॅथीचा सराव करण्यास मुभा देण्यात येणार नाही. ही बाब रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने सीसीएमपी या ब्रिज कोर्सचा अभ्यास करून होमिओपॅथी डॉक्टरांनी किती सराव करावा यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतरच होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचा सराव करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.
७६०० जणांची नोंदणी शक्य
गेल्या १० वर्षांमध्ये जवळपास ७६०० होमिओपॅथी डॉक्टरांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. राज्यातील सरकारी वैद्याकीय महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे.
‘आयएमए’चे आंदोलन
●सीसीएमपी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना १५ जुलैपासून महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.
●या निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएने शुक्रवारी राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
●या कालावधीतील शस्त्रक्रियाही रद्द करण्यात आल्या आहेत. या संपामध्ये जवळपास १ लाख ८० हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.