मुंबई : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची स्वतंत्र नोंदवहीमध्ये नोंद करण्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये राज्य सरकारने शुक्रवारी मान्यता दिली. या निर्णयाचा थेट फायदा गेल्या दहा वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ७६०० होमिओपॅथी डॉक्टरांना होणार आहे.

राज्य सरकारने २०१४ मध्ये सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदवहीत नोंदणी करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारने विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागविला होता. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यामध्ये कोणताही अडथळा नसल्याचा अभिप्राय या विभागाकडून देण्यात आला. तसेच होमिओपॅथी व वैद्यकीय डाॅक्टरांचे स्वतंत्र नोंदणीपुस्तक ठेवल्यास या डॉक्टरांमध्ये पक्षपाताचा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही, असेही सांगण्यात आले. स्वतंत्र नोंदणीपुस्तकामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होण्याबाबत महाधिवक्त्यांचा अभिप्रायही शासनाकडून घेण्यात आला. त्यांनीही ‘उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशांच्या अधीन राहून रजिस्टर तयार करण्यात येईल आणि त्यामुळे पक्षपाताचा दावा कोणत्याही कारणास्तव करता येणार नाही’ असा अभिप्राय दिला.

या दोन्ही अहवालांच्या आधारे राज्य सरकारने शुक्रवारी सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे स्वतंत्र नोंदणीपुस्तक ठेवण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

एका संघटनेने विरोध करून सरकारची दिशाभूल केल्याने ११ जुलैच्या परिपत्रकाच्या माध्यमातून निर्णय रद्द करण्यात आला. अखेर सरकारने योग्य निर्णय घेत होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा दिला आहे. – डॉ. बाहुबली शाह, प्रशासक, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद

होमिओपॅथी डॉक्टरांना ‘एमएमसी’मध्ये नोंदणी करण्यास मान्यता देण्याच्या निर्णयावर स्थगिती असतानाही सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यासाठी अर्ज करणार आहोत. – संतोष कदम, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन