गृहसंकुलांचा केंद्रबिंदू पूर्व उपनगराकडे
दक्षिण मुंबईतील महागडय़ा घरांची मक्तेदारी मोडीत काढत गेल्या तीन वर्षांत पश्चिम उपनगराने घरांचे नवीन उद्योगकेंद्र अशी आपली ओळख निर्माण केली होती. यंदा मात्र पश्चिम उपनगराची ही मक्तेदारी पूर्व उपनगरातील कुर्ला-नाहूर या पट्टय़ाने मोडीत काढली आहे. गेल्या वर्षभरात या विभागातील घरांच्या किमतीत रेडी रेकरनच्या दरापेक्षा तब्बल १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. साहजिकच येत्या १ जानेवारीपासून लागू होणाऱ्या नव्या रेडी रेकनर दरामध्ये पूर्व उपनगरातील घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तीन-चार वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील घरांच्या आणि व्यापारी जागांच्या किमती अवाच्या सवा होत्या. दक्षिण मुंबई हे उद्योग आणि व्यापार केंद्र असल्याने घरांना तसेच व्यापारी जागांनाही अधिक भाव मिळत होता. मात्र गेल्या तीन-चार वर्षांत घरांच्या उद्योगाचा केंद्रबिंदू पश्चिम उपनगराकडे सरकला आहे. त्यातूनच अंधेरी, मालाड, गोरेगाव, बोरिवली हा भाग घरांच्या उद्योगाचा केंद्रबिंदू झाला असून जमिनीची उपलब्धता आणि लोकांची मागणी यातून घरांची निर्मिती आणि दरातही गेल्या तीन वर्षांत झपाटय़ाने वाढ झाल्याचे मुंद्राक आणि नोंदणी विभागातील सूत्रांनी सांगितले. या वर्षांत पश्चिम उपनगरातील घरांचे दर रेडी रेकनरपेक्षा अधिक राहिले. बोरिवली तालुक्यातील १८० पैकी १२५ विभागांमध्ये १० ते२० टक्के वाढ झाली आहे. प्रामुख्याने गोरेगाव, मालाड, दहिसर या भागात रेडी रेकनरपेक्षा तब्बल २० ते २५ टक्के वाढीने घरांचे व्यवहार झाल्याचे त्यामुळे रेडी रेकनरच्या दरापेक्षा या भागातील घरांच्या किमतीत सरासरी १० ते १५ टक्के वाढ झाली. तर अंधेरी तालुक्यातील १५३ विभागांपैकी तब्बल १०० विभागांत रेडी रेकनरच्या दरापेक्षा १२ ते १४ टक्के वाढीव दराने घरांचे व्यवहार झाले. प्रामुख्याने विलेपार्ले, अंधेरी, वांद्रे (पश्चिम) वर्सोवा या भागांत ही वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई जिल्ह्य़ात २२३ पैकी १०८ विभागांत रेडी रेकनरच्या दरापेक्षा किंचित वाढीव दराने घरांचे व्यवहार झाले आहेत. दादर, नायगाव, न्यू कफ परेड (वडाळा), माटुंगा, मलबार हिल या विभागांत ही वाढ असून लोअर परेल यासारख्या भागात मात्र घरांचे दर रेडी रेकनरपेक्षा कमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेडी रेकनरच्या दरात वाढीची शक्यता
* पूर्व उपनगरातील कुर्ला-मुलुंड या पट्टय़ात गेल्या वर्षभरात घर आणि व्यापारी जागांच्या किमतीत रेडी रेकरनच्या दरापेक्षा तब्बल १५ ते २० टक्केवाढ
* कुर्ला तालुक्यातील १९२ पैकी तब्बल १३४ विभागांत ही वाढ आढळून आली असून कांजूर, भांडुप, नाहूर, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर भागांतील घरांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे विभागाकडे झालेल्या नोंदणीवरून दिसून येते.
* नवीन रेडी रेकरनमध्ये दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराच्या तुलनेत पूर्व उपनगरातील रेडी रेकनरच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House rate increase in kurla
First published on: 26-12-2015 at 02:59 IST