कल्याण व डोंबिवली शहरांमध्ये गेल्या काही दिवासंपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कल्याणमधील खडकपाडा भागात ‘श्री मेडिकल’ नावाचे औषधाचे दुकान शुक्रवारी रात्री फोडून चोरटय़ांनी रोख रकमेसह ७५ लाखांची औषधे चोरून नेली, तर डोंबिवलीत विष्णूनगर भागात एका बंद घराचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी ५२ हजाराचा ऐवज चोरून नेला. औषध दुकान मालक तुषार मोरे शुक्रवारी रात्री दुकान बंद केले. शनिवारी सकाळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे आढळले. डोंबिवलीतील कोपर क्रॉस रस्त्यावरील किल्डन इमारतीत राहणारे रामन कृष्णमूर्ती कुटुंबासह चेन्नई  येथे गेले असता त्यांच्या घरी चोरी झाली.