प्रभादेवी येथील एका व्यापाऱ्याच्या घरात ३० लाखांचा डल्ला मारणाऱ्या एका नोकराला दादर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे रस्त्यात सापडलेल्या मदतान ओळखपत्राच्या आधारे त्याने या व्यापाऱ्याकडे घरगडय़ाचे काम मिळवले होते. अजय मंडल (२५) असे या आरोपीचे नाव आहे.
मंडलला रस्त्यात आलोक पासवान नावाच्या इसमाचे मतदान ओळखपत्र सापडले होते. त्याने मग आलोक पासवान या नावानेच प्रभादेवी येथील एका व्यापाऱ्याच्या घरी घरगडय़ाचे काम मिळवले. दोन महिने त्याने काम केले. मात्र १४ सप्टेंबर रोजी संधी मिळताच त्याने घरातील ३ लाखांची रोकड आणि तिजोरीतील २७ लाखांचे दागिने घेऊन पळ काढला होता.
पोलिसांच्या पथकाने मंडलचा माग काढला असता तो बिहारमधील एका खेडय़ात असल्याचे कळले. पोलिसांनी मग तेथे जाऊन त्याला अटक केली.