मुंबई : हैदराबाद – सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाच्या (एचएसएनसी) पदवी अभ्यासक्रमांसाठीची पहिली कट-ऑफ यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यापीठांतर्गत असलेल्या मुंबईतील केसी आणि एचआर या महाविद्यालयांची टक्केवारी जास्त असल्याने प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

वाणिज्य शाखेअंतर्गत बीकॉम, बीएएफ, बीएफएम, बीबीआय यासारख्या अभ्यासक्रमांची कट-ऑफ ९५ टक्क्यांच्या आसपास आहे. केसी महाविद्यालयात बीकॉमची कट ऑफ ९६.३३ टक्के असून, एचआर महाविद्यालयात बीकॉमची कट-ऑफ ९५ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी या दोन्ही महाविद्यालयांमध्ये बीकॉमची कट-ऑफ ९६ टक्के एवढी होती. बीएएफसाठी पहिल्या यादीत यंदा एचआर महाविद्यालयात ९५ टक्के आणि केसी महाविद्यालयात ९६ टक्के कट-ऑफ आहे.

कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांमधून करता येणाऱ्या बीएएमएमसी अभ्यासक्रमाच्या कटऑफमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित घसरण झाली आहे. गेल्या वर्षी एचआर महाविद्यालयात या दोन्ही शाखांमध्ये अनुक्रमे ९१ आणि ९०.५० टक्के असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. तर केसी महाविद्यालयात ९३.६६ आणि ९०.८० टक्के कट – ऑफ होता. यंदा एचआर महाविद्यालयात यासाठी कट ऑफ ९० आणि ९०.१७ टक्के एवढा आहे. केसी महाविद्यालयात त्यात वाढ झाली असून तो ९४ आणि ९३.२० टक्के एवढा आहे.

बीएएफएमएमपी, बीएससी आयटी आणि बायोटेक अशा विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांमध्ये काही बदल झाले आहेत. केसी कॉलेजमध्ये बीएससी आयटीसाठी मागील वर्षी ९२ टक्के कट-ऑफ होतो, तो यंदा ८० टक्क्यांवर आला आहे. त्याशिवाय मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आदी गटांमधील बीए अभ्यासक्रमासाठी कट-ऑफ मात्र ९६.२० टक्क्यांवर स्थिर राहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाच्या स्कूल्समधून चालवले जाणाऱ्या काही अभ्यासक्रमांमध्ये नवीन ट्रेंड दिसत आहे. स्कूल ऑफ अप्लाइड सायन्सेसच्या बीएससी डेटा सायन्स कोर्ससाठी कट-ऑफ यंदा ८६.१७ टक्क्यांवर गेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा या टक्केवारीत तब्बल सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये या कट-ऑफमुळे चुरस अपेक्षित आहे.