मुंबई- लाडकी बहिण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. या बँक खाती प्रकरणाचा मुख्य सुत्रधार गुजरात मधील असून तो सध्या फरार आहे.

राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. त्या योजनेअंतर्गत महिलांना मासिक वेतन दिले जाते. त्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते. नेमका याच गोष्टींचा फायदा एका टोळीने घेतला. गुजरात राज्यातील प्रतिक पटेल याने आपली माणसे नेमली आणि लोकांची बँक खाती उघडली. अविनाश कांबळे हा या प्रकरणातील एक आरोपी असून त्याला जुहू पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्यास सुरवात झाली. अविनाश कांबळे (२५) हा नेहरूनगर, देवनार, डीएन नगर, धारावी आदी परिसरातील झोपडपट्टी परिसरात फिरायचा. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लोकांकडून कागदपत्रे घेऊन बँक खाती उघडायचा आणि त्यांना तात्काळ १ हजार रुपये द्यायचा. त्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेते पैसे येतील असे आश्वासन द्यायचा. तात्काळ १ हजार रुपये मिळत असल्याने लोकांचाही विश्वास बसायचा.

ही बँक खाती तो टोळीतील फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना विकायचा. प्रत्येक खात्यामागे त्याला ४ हजार रुपये मिळत होते. हे त्रिकुट बँकांचे तपशील गुजरातमधील प्रतिक पटेल याला द्यायचे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीची पाळेमुळे खणण्यास सुरवात केली. जुहू पोलिसांनी अविनाश कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने अनेक बँक खाती उघडल्याचे निष्पन्न झाले. दुसरी आरोपी श्रुती राऊत हिच्या घराती झडती घेतली असता अनेक बँकाचे पासबुक, बँकांशी संलग्न सिमकार्ड मिळाली. लाडकी बहीण योजना महिलांसाठी आहे. मात्र आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरूषांची होती.

बँक खाती कशासाठी?

बँक खाती उघडताना बँकेने संबंधित ग्राहकाच्या पत्त्याची शहानिशा करणे आवश्यक असते. मात्र बँक ती करत नाही. याचा फायदा घेत आरोपींनी लोकांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने शेकडो बँक खाती उघडली असे जुहू पोलिसांनी सांगितले. सायबर गुन्ह्यामधील फसवणुकीची रक्कम तिसऱ्या खात्यात (थर्ड पार्टी ) जमा केली जाते आणि मग तिथून पैसे काढले जातात. त्यासाठी आरोपी अशी बँक खाती तयार करत होते. याशिवाय अनेकांचा काळा पैसा दडविण्यासाठी देखील या बँक खात्यांचा वापर केला जात असल्याचे जुहू पोलिसांनी सांगितले. आम्ही शंभर पेक्षा अधिक बँक खाती बँकेला संपर्क साधून बंद केली आहेत. मात्र आरोपींनी अडीच हजार बँक खाती उघडल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या आरोपींकडून विविध कागदपत्रे तसेच १९ लाख ४३ हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या प्रतिक पटेल हा गुजराथ मध्ये असून तेथून तो सुत्रे हलवत होता. जुहू पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.