किरीट सोमय्या यांच्या मुलाला अपघात झाला किंवा त्याने काही करून घेतले, अशी चर्चा आहे. पोटच्या मुलाचे असे काही झाल्यावर काय वेदना होतात हे सोमय्या यांनी अनुभवले असेल. माझ्या पुतण्याला झालेली अटक किंवा मुलाची चौकशी यामुळे मलाही वेदना होत आहेत. मलाही अटक होणार असे बोलले जाते. मी अटकेला घाबरत नाही, पण चौकशीत सर्व सहकार्य करीत असताना अटकेची आवश्यकता काय, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नेहमीच्या आक्रमक भूमिकेला छेद देत काहीशी नरमाईची भूमिका मंगळवारी स्वीकारली.
अमेरिका दौऱ्यावरून परतलेल्या भुजबळ यांचे विमानतळावर स्वागत करताना समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. ‘मी कोणतेही चुकीचे कृत्य केले नसल्याने साऱ्या कायदेशीर कारवाईतून सहीसलामत बाहेर पडेन’, असा विश्वास व्यक्त करीत सर्वाना संयम पाळण्याचे आवाहन भुजबळ यांनी समर्थकांना केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन, कलिना येथील ग्रंथालयाची इमारत आणि नाशिकचा महोत्सव याबाबतची बाजू मांडली. या कारवाईबाबत आतापर्यंत भाजपला दोष देणाऱ्या भुजबळांनी भाजपवर थेट निशाणा साधण्याचे टाळले. राजकीय प्रश्नांवर थेट उत्तर देण्याचे टाळून, आपण काहीही चुकीचे केलेले नाही, हेच त्यांनी वारंवार सांगितले. फक्त किरीट सोमय्या यांच्या इशाऱ्यावर सरकार कारवाई करते का, असा सवालही त्यांनी या वेळी केला.
गेले आठ-नऊ महिने आम्ही चौकशीत सहकार्य केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने समीर यांच्याकडे १५ वर्षांची सारी कागदपत्रे मागविली होती. ही कागदपत्रे जमविण्यात काहीसा विलंब झाला. हा अपवाद वगळता आम्ही सर्वानी चौकशीला नेहमीच सहकार्य केले आहे. समीरला अटक करून काय साध्य झाले, असा सवाल त्यांनी केला. समीरला झालेली अटक, पंकजची चौकशी या पाश्र्वभूमीवर आपल्याला अटकेची भीती वाटते का, या प्रश्नावर, चौकशीत सहकार्य केले आहे तसेच आपण निष्पाप आहोत. यामुळे आपल्या अटकेची आवश्यकता नाही व अटक होईल असे वाटत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.
राजकीय हेतूने आपल्याला तेलगी घोटाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला. आताही बांधकाम खात्यात झालेल्या कामांमध्ये घोटाळा झाला, असा आरोप करीत गुंतविण्याचा काही ‘हितचिंतकां’कडून प्रयत्न झाला आहे. हे हितचिंतक स्वपक्षीय किंवा अन्य पक्षातील आहेत का, या प्रश्नावर त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाध्यक्ष शरद पवार हे आपल्या पाठीशी आहेत, असे स्पष्ट केले.

पहिल्या फळीतील नेते गायब..
सध्याच्या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर विमानतळ आणि राष्ट्रवादीच्या मुख्यालयाच्या बाहेर भुजबळ यांनी शक्तिप्रदर्शन केले. भुजबळांचे नाशिकमधील समर्थक मोठय़ा प्रमाणावर दाखल झाले होते. पक्षाच्या मुख्यालयात नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, संजय पाटील वगळता अन्य कोणीही नेता उपस्थित नव्हता. पक्षाध्यक्ष पवार यांनी भुजबळांची बाजू उचलून धरली असली तरी पक्षात ते एकाकी पडल्याचे चित्र दिसत होते.