माझ्या पराभवासाठी मीच जबाबदार आहे. त्याचा दोष कॉंग्रेसच्या इतर नेत्यांना देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी व्यक्त केली. वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा १९ हजार मतांनी लाजीरवाणा पराभव केला. या पराभवानंतर राणे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली.
ते म्हणाले, वांद्र्यामध्ये मतदारांनी विकासाला मते न देता भावनिक आधारावर मते दिली. लोकांना विकास नको असेल, तर माझी काही तक्रार नाही. माझ्या पराभवासाठी मीच जबाबदार आहे. कॉंग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यासाठी प्रचार केला. त्यामुळे इतर कोणाला मी दोष देणार नाही. भविष्यात काय करायचे, हे मी ठरवेन. तो माझा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले, निष्ठा काय असते हे मला कोणी शिकवू नये. महापालिकेच्या पैशांवर जगतात ते निष्ठावान का, पदांसाठी पैसे घेतात ते निष्ठावान का, दोन टक्क्यांवर जगतात ते निष्ठावान का, असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. मला निवृत्तीचा सल्ला देणाऱया गिरीश महाजन यांची स्वतःची लायकी काय, असाही टोला त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am responsible for my defeat says narayan rane
First published on: 15-04-2015 at 02:27 IST