Marathi Vs Hindi Mumbai Video: मुंबईतील घाटकोपरमध्ये काही लोक एका महिलेला मराठीत बोलण्याचा आग्रह करत असल्याचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजिरा देवी असे नाव असलेली ही महिला मराठीमध्ये बोलण्यास नकार देत, “हिंदीच बोलणार” असे म्हणत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, “मराठीत बोला. हा महाराष्ट्र आहे”, असे एकजण या महिलेकडे बोट करत म्हणाला. यावर ती महिला म्हणाली, “नाही बोलणार. तुम्हीच हिंदीत बोला. मला सांगा, तुम्ही हिंदुस्थानी नाही का? तुम्ही हिंदुस्थानचे नाही का?”

यावर, “महाराष्ट्र, महाराष्ट्र,” असे म्हणत समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सुरू होता, तेव्हा त्यांच्याभोवती गर्दी जमू लागली होती. या दरम्यान कोणीतरी पोलिसांना बोलावले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत ते लोक निघून गेले होते.

तत्पूर्वी १८ जुलै रोजी लोकल ट्रेनमध्ये ‘मराठी येत नसेल तर मुंबईतून चालते व्हा’ असे सांगत महिला आक्रमक झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या व्हिडिओचे स्वागत केले होते. सर्वसामान्य महिलांमधील मराठी भाषेचा स्वाभिमान जागृत होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे मनसेने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी कुठलीही तक्रार न आल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवार, १८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या भायखळा आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली होती. लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात जागेवरून भांडण सुरू होते. महिला एकमेकांशी भांडत होत्या. एक महिला हिंदीत वाद घालत होती. त्यावेळी एका महिलेने “मराठी येत नसेल तर मुंबईतून चालते व्हा” असा इशारा दिला. त्यानंतर इतर मराठी भाषिक महिला एकवटल्या आणि मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्या. बसण्याच्या जागेवरून सुरू झालेले भांडण थेट मराठी भाषेच्या मुद्द्यावर पोहोचले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये मराठी न बोलल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मुंबईत मराठी बोलण्यावरून वातावरण तापले होते. याचा निषेध म्हणून अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत आंदोलन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मराठी नागरिकांनीही अमराठी व्यापाऱ्यांचा निषेध नोंदवला होता.