मुंबई : ‘आमच्या विचारांचे लोक संसदेत कमी झाले आहेत. परंतु या विचारांचे नागरिक जोपर्यंत देशात आहेत, तोपर्यंत संविधान राहणारच आणि देशात बदल घडणारच. माझा देशातील सर्वसामान्य जनतेवर विश्वास आहे. आज इमानदार लोकांमुळे देश चालला आहे. पूर्वीच्या काळात वैचारिक लढाई होती आणि वैचारिक लढाईत मतभेद झालेच पाहिजेत, पण मनभेद होता कामा नये. त्यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टोकाची टीका केली, पण टीकेकडे निखळ मनाने पाहिले. या गोष्टीलाच सशक्त लोकशाही म्हणतात. त्यामुळे आम्ही जेव्हा सत्ताधारी पक्षावर टीका करतो. तसेच एखाद्या विधेयकावर काही सांगतो. तेव्हा आमच्या चार गोष्टी ऐकून घेतल्या आणि बदल करीत अंमलबजावणी केली, तर विधेयक चांगले होऊन तुमचीच मते जास्त वाढणार आहेत’, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.
आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक व वक्ते, माजी मंत्री आणि बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक दादासाहेब रुपवते यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, १९ जुलै रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच उल्हास पवार, शिरिष चौधरी, दादासाहेब रुपवते यांची नात उत्कर्षा रूपवते आणि रूपवते कुटुंबियांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. ‘दादासाहेब रूपवते अभिवादन सभा’ या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते आणि अध्यक्ष बी. आर. कदम यांनी सहकाऱ्यांसह सांभाळली होती.
‘सर्व दिग्गजांच्या केवळ योगदानामुळे नाही, तर त्यांच्या त्यागामुळेही महाराष्ट्र उभा राहिला. तेव्हाची प्रतिष्ठा तुमचे घड्याळ, गाडी आणि घरावरून ठरत नव्हती. तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या बुद्धिमत्तेवर होती. तो काळ महाराष्ट्राचा होता. पूर्वीच्या आणि आताच्या महाराष्ट्रात प्रचंड बदल झाला असून हे आपले दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत, मातीत व शैक्षणिक क्षेत्रात दादासाहेब रूपवते यांच्यासारख्या दिग्गजांचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी युवा पिढीने पुढे सरसावले पाहिजे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच ‘हनी ट्रॅप’शी संबंधित बातम्या वाढत आहेत. यामध्ये मंत्र्यांचीही नावे येत आहेत. हे गलिच्छ संस्कार आम्ही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा. दररोज दूरचित्रवाणीवर महाराष्ट्राची लाज काढू नका, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘दादासाहेब रूपवते बहुआयामी व्यक्तिमत्व होते आणि त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व असण्यासह संघटनकौशल्य उत्तम होते. त्यांच्या सहवासातून प्रत्येक क्षणाला खूप काही शिकलो. तर महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी मानवता, समता आणि लोकशाहीचा मूलमंत्र दिला, तो मूलमंत्र उध्वस्त करण्याचे महाभयंकर काम कोणताही पक्ष नसून एक शक्ती करीत आहे. त्यामुळे जागरूक लोकांनी शांत बसता कामा नये’, असे उल्हास पवार यांनी सांगितले. तर शिरिष चौधरी म्हणाले की, ‘आम्हाला चांगले वागावे, हे आई वडिलांकडून व शाळेत शिकविण्यात आले आणि आमच्यावर संस्कार झाले. परंतु त्यापलीकडची जाणीव आणि न्यायासाठीचा व समतेसाठीचा आग्रह दादासाहेब रूपवते यांच्या सहवासामुळे आमच्यात आला.’