मुंबई : अंधेरीच्या मरोळ भागातील मकवाना मार्गावरील पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे नागरिकांना चालायला जागा शिल्लक राहिलेली नाही. तसेच, अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही महापालिकेकडून कारवाईत दिरंगाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एखाद्या वेळी कारवाई झालीच, तर काही वेळ पदपथ मोकळे होतात. मात्र, महापालिकेचे कर्मचारी गेल्यांनतर पुन्हा पदपथांवर अतिक्रमण केले जाते.
मुंबईत फेरीवाल्यांच्या समस्येने नागरिक हैराण झाले असून अद्यापही ही समस्या मार्गी लावण्यात महापालिकेला यश आलेले नाही. रस्ते व पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना चालायला जागा शिल्लक नसते. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करीतच रस्त्यावरून चालावे लागते. अंधेरीत मोठमोठ्या खाजगी कंपन्या, शाळा, रुग्णालये, महाविद्यालय असल्यामुळे येथील रस्त्यांवर सतत वर्दळ असते. त्यातच रस्ते व पदपथांवर पथाऱ्या पसरून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
फेरीवाले, वाहतूक यातून मार्ग काढत नागरिकांना चालावे लागते. मकवाना मार्गवर दुतर्फा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून फेरीवाले दररोज रात्री १२, १ पर्यंत व्यवसाय करीत असतात. फेरीवाल्यांबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप फेरीवाल्यांच्या गर्दीतून पदपथ मोकळे झालेले नाहीत. महापालिकेकडून काही वेळा कारवाई केली जाते.
कारवाईनंतर एक-दीड तासासाठी पदपथ मोकळे होतात. मात्र, फेरीवाले पुन्हा पदपथावर अतिक्रमण करतात, असे स्थानिक रहिवासी सुधाकर पडवळ यांनी सांगितले. पदपथांवरील अनधिकृत स्टॉलधारक रात्री एक-दोन पर्यंत गॅस शेगडीचा वापर करतात. तसेच, गॅस शेगडीचा स्फोट होऊन मोठी जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिवसेंदिवस फेरीवाल्यांचा विषय फार गंभीर होत आहे. जागोजागी फेरीवाले दिसत असून त्यावर पालिकेचा कोणताही अंकुश नाही. पालिकेकडे तक्रार केल्यांनतर फेरीवाल्यांवर तात्पुरती कारवाई केली जाते. फेरीवाल्यांच्या समस्येचे कायमचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्या, असे मत पडवळ यांनी व्यक्त केले.