मुंबई : उद्योगांची गरज लक्षात घेत आयआयटी मुंबईने मागील काही दिवसांमध्ये विविध नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यातूनच आयआयटी मुंबईच्या औद्योगिक अभियांत्रिकी आणि ऑपरेशन्स रिसर्च विभागामार्फत (आयईओआर) एआय आणि एमएल ॲप्लिकेशन्ससह ‘पुरवठा साखळी विश्लेषण’ (सप्लाय चेन ॲनालिटिक्स) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. ग्रेट लर्निंगच्या सहकार्याने ऑक्टोबर २०२५ पासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमासाठी आयआयटी मुंबईकडून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
व्यावसायिकांची गरज लक्षात घेत आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी एआय आणि एमएल ॲप्लिकेशनचा वापर करून पुरवठा साखळी विश्लेषण अभ्यासक्रम तयार केला आहे. यामध्ये पाच एकात्मिक मॉड्यूल्ससह, पुरवठा साखळी विश्लेषणाची माहिती, बाजारातील मागणी, अंदाज, नियोजन, नेटवर्क, ऑप्टिमायझेशन, वाहतूक आणि जोखीम यावर अधिक भर दिला आहे. तसेच परिस्थितीविषयक चर्चांद्वारे प्रत्यक्ष शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये अद्ययावत शोध मॉडेल, आराखडे, जाळे, मागणी अंदाजासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदम आणि परिस्थिती नियोजनासाठी जेनएआय यांचा समावेश करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा असलेला हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे.
एआय आणि एमएल ॲप्लिकेशन्ससह पुरवठा साखळी विश्लेषण अभ्यासक्रम हा व्यावसायिकांना सुसज्ज करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये अत्याधुनिक एआय आणि मशीन लर्निंग टूल्सचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि पुरवठा साखळीमध्ये नवीन कार्यक्षमता निश्चित करण्यास मदत होणार आहे. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे राष्ट्रीय आणि जागतिक लॉजिस्टिक्सचे जाळे मजबूत करण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यात लवचिकता, नावीन्य आणि शाश्वतता सुनिश्चित होईल. तसेच व्यावसायिकांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करण्यासाठी आयआयटी मुंबई वचनबद्ध आहे, असे आयआयटी मुंबईच्या शैक्षणिक आउटरीचच्या डीन प्रा. उषा अनंतकुमार यांनी सांगितले.
आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांच्या अनुभवाचा फायदा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यांना पुरवठा साखळी विश्लेषणाची संपूर्ण माहिती मिळाल्याने त्यांना नियोजन आणि अंमलबजावणीशी संबंधित निर्णयांमध्ये एआय आणि डेटा विश्लेषणाचा वापर करणे सोपे होईल, असे ग्रेट लर्निंगचे संस्थापक आणि सीईओ मोहन लखमराजू यांनी सांगितले.
कोण घेऊ शकतो प्रवेश?
हा अभ्यासक्रम व्यावसायिकांना एआय, डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक फायदा मिळवून देणारे लवचिक, भविष्यासाठी पुरवठा जाळे तयार करण्याचे कौशल्य देतो. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के किंवा समकक्ष सीजीपीए असलेले बॅचलर पदवी धारण करणारे उमेदवार या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास पात्र आहेत. हा अभ्यासक्रमाचा फायदा सप्लाय चेन ॲनालिटिक्स आणि ऑपरेशन्स व्यावसायिक, सल्लागार आणि लॉजिस्टिक्स, खरेदी, इन्व्हेंटरी किंवा डेटा आणि व्यवसाय बुद्धिमत्ता व्यावसायिकांना होणार आहे.