मुंबई : देशातील वाढत्या मधुमेहग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई, उस्मानिया मेडिकल कॉलेज आणि क्लॅरिटी बायो सिस्टिम्सच्या संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासात मधुमेह आणि मूत्रपिंडविकार आधीच ओळखण्याची महत्त्वाची शक्यता अधोरेखित केली आहे. ‘जर्नल ऑफ प्रोटिओम रिसर्च’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार रक्तातील अतिसूक्ष्म प्रोटीन व पेप्टाइड्समधील बदल रोग पुढे जाण्याआधीच दिसू लागतात.

भारतामध्ये सध्या आठ कोटींहून अधिक व्यक्तींना मधुमेह असून जवळपास १३ कोटी जण प्रि-डायबेटिक श्रेणीत आहेत. निदानासाठी प्रचलित चाचण्या दोष दाखवतात तेव्हा शरीरातील नुकसान मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले असते, असा इशारा तज्ज्ञांनी आधीच दिला आहे.संशोधनात प्रोटिओमिक्स या प्रगत जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रातून प्रि-डायबेटिक आणि मधुमेहग्रस्त व्यक्तींच्या रक्तातील रेणूंतील बदल स्पष्ट दिसून आले. शरीरातील सूक्ष्म दाह, चयापचयातील बिघाड, तसेच मूत्रपिंडावरील आरंभीचा ताण यांचे संकेत या रेणूंमधून मिळू शकतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सध्या वापरल्या जाणाऱ्या एचबीएवन सी, उपाशी रक्तशर्करा चाचणी तसेच अन्य चाचण्या अनेकदा रोग बराच पुढे गेल्यानंतरच असामान्यता शोधतात. परिणामी मधुमेहामुळे उद्भवणारे हृदयरोग, मज्जासंस्थेवरील परिणाम आणि विशेषतः मूत्रपिंडाची हानी लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो.या नव्या पद्धतीमुळे लवकर चेतावणी मिळण्यास मदत होऊ शकते. संशोधकांच्या मते पुढील काही वर्षांत या तंत्रज्ञानावर आधारित जलद चाचण्या, एआय आधारित अंदाज व वैयक्तिक उपचार योजना विकसित होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावरचा जनसंख्या अभ्यास आणि वैद्यकीय मान्यता मिळाल्यानंतर हे तंत्र सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.

या अभ्यासात संशोधकांनी प्रोटिओमिक्स या प्रगत तंत्राचा वापर करून विविध गटांतील व्यक्तींचे रक्त नमुने तपासले. यात ज्यांना कोणाताही आजार नाही अशा व्यक्ती,प्रि-डायबेटिक,तसेच मधुमेहग्रस्त या तिन्ही गटांतील व्यक्तींचा समावेश होता. प्रोटिओमिक्स तंत्रामुळे शरीरातील प्रोटीन व रेणूंच्या संरचनांमध्ये होणारे अतिसूक्ष्म बदलही ओळखता येतात. याच सूक्ष्म लक्षणांचा उपयोग रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्याचे भाकीत करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

या प्रोटिओमिक्स तंत्रामुळे रक्तातील प्रोटीनमध्ये दिसणारे सूक्ष्म बदल अगदी सुरुवातीला दाखवू शकते. यामुळे रुग्णाला औषधोपचार स्वीकारण्याऐवजी जीवनशैलीत बदल करूनच मधुमेह होण्याची शक्यता कमी करता येऊ शकते. मूत्रपिंडावरील परिणामही आधीच कळू शकतात.डायबेटिक नेफ्रोपथी म्हणजे मधुमेहामुळे मूत्रपिंडांची होणारी हानी हा देशात चिंतेचा विषय आहे. अनेकदा ही हानी उशिरा कळते. त्यावेळी उपचार मर्यादित असतात. अभ्यासानुसार,प्रोटिओमिक्स तंत्राने मूत्रपिंडांवर वाढणारे दडपण, पेशींचा दाह,रक्तशुद्धी प्रक्रियेत होणारे सूक्ष्म बदल हे सर्व क्लिनिकल लक्षण दिसण्याआधीच ओळखण्याची क्षमता दर्शवली आहे.

याबाबतचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे असून आयसीएमआरच्या माहितीनुसार ११.४ टक्के प्रौढ मधुमेही १५.३ टक्के प्रि-डायबेटिक मधुमेह हा दीर्घकालीन, आर्थिकदृष्ट्या महागडा आणि जटिल उपचार असलेला आजार असल्याने त्याचा भार देशाच्या आरोग्यव्यवस्थेवरही वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रोटिओमिक्स हे तंत्र व्यापक वापरासाठी विकसित झाल्यास आजाराचे लवकर निदान, वेळीच उपचार, जीवनशैली बदल आणि जागरूकता यामुळे मधुमेहाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संशोधकांच्या मते रक्तातील रेणूंचा ‘स्वाक्षरी पॅटर्न’ (मॉल्युक्युलर सिग्नेचरस्) तयार करता येईल. एआय आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने रोगाचा धोका सहज ओळखता येईल प्रोटिओमिक्स-आधारित डायग्नोस्टिक किट विकसित करण्याची शक्यता आहे निदान स्वस्त, जलद आणि अचूक करता येईल ही प्रगत तंत्रे आरोग्यसेवा अधिक वैयक्तिक आणि प्रेडिक्टिव बनवू शकतात, असा अभ्यासकांचा दावा आहे. अर्थात अजूनही काही आव्हाने यात आहेत.जसे की मोठ्या प्रमाणावर जनसंख्या अभ्यास आवश्यक,उपकरणे व तंत्रज्ञान महाग प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता वैद्यकीय मान्यता आवश्यक या सर्वांवर मात झाल्यास प्रोटिओमिक्स ही मधुमेह निदानाची नवी सीमा ठरू शकते. निष्कर्ष नव्या संशोधनातून एक स्पष्ट होते की रक्तातील प्रोटीन व रेणूंचे अतिसूक्ष्म बदल मधुमेह, तसेच मूत्रपिंडांवरील धोका पारंपरिक चाचण्यांपूर्वीच उघड करू शकतात. म्हणजेच रोगाचे उंबरठ्यावरच निदान करण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट होत आहे.