मुंबई : जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी विविध आविष्कारांचा खजिना ठरलेल्या ‘आयआयटी मुंबई’च्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदाच्या वर्षी नावीन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले आहेत. ‘टेकफेस्ट’अंतर्गत ‘टेककनेक्ट’मध्ये ‘टीमरक्षक’चे मानवविरहित विमान आणि ड्रोन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपत्कालीन स्थितीत संबंधित ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंसह वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी मानवविरहित विमान आणि ड्रोन उपयोगात आणले जातील.

महापूर आणि भूकंपाच्या वेळी दुर्गम भागात मदतीची आवश्यकता असते. अशा वेळी ही मदत नागरिकांना पोहोचविण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईतील एरोस्पेस, मेकॅनिकल, स्थापत्यशास्त्र, संगणकशास्त्र आदी विविध विभागांमधील विद्यार्थ्यांच्या ‘रक्षक’ टीमने एका स्पर्धेसाठी प्रायोगिक तत्त्वावर मानविरहित ‘एरिस’ विमान आणि ‘स्कायहॉक’ ड्रोन तयार केले आहे. इंग्लंडमध्ये जून २०२४ मध्ये झालेल्या ‘यूएएस चॅलेंज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खास या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. त्यातील मानवरहित विमान आणि स्कायहॉक ड्रोनने ‘ऑपरेशनल सपोर्टिबिलिटी २०२४’ हा पुरस्कारही पटकावला.

हेही वाचा…जुहू, डी एन नगरमधील इमारत उंचीवरील बंदीचा निर्णय प्रलंबित! ४०० हून अधिक इमारतींच्या पुनर्विकासाला फटका

प्रकल्पपूर्तीसाठी नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र काम केले. विमान तयार करण्यासाठी सुमारे १ लाख ३० हजार आणि ड्रोन तयार करण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये खर्च आला. आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ला १९ डिसेंबरपर्यंत भेट देता येईल.

हेही वाचा…‘बीएनएचएस’ची निसर्ग जागरुकता आणि स्वच्छता मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्ट्ये

‘एरिस’ विमानाचे वजन पाच किलो आणि स्कायहॉक ड्रोनचे वजन सात किलो असून साहित्यासाठी विशेष जागा असेल. विमान तीन तर ड्रोन आठ किलो साहित्य वाहू शकेल. एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग ‘जीपीएस’ यंत्रणेद्वारे निश्चित करण्यात येतो. विमान वा ड्रोन ठरलेल्या ठिकाणी जात असताना संबंधित मार्गाचे निरीक्षणही करता येते.