या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वांद्रय़ाच्या बेहरामपाडय़ात पत्र्यांच्या झोपडय़ा; पूर्वेकडील स्कायवॉक गिळंकृत

महापालिका प्रशासनाचा मठ्ठपणा आणि सर्वच राजकीय पक्षांकडून मिळणारा आशीर्वाद यामुळे वांद्रे (पूर्व) येथील बेहरामपाडय़ात पत्र्यांच्या झोपडय़ांचे इमलेच्या इमले उभे राहत आहेत. काही वर्षांपूर्वी ही झोपडपट्टी आगीने गिळंकृत केली होती. परंतु, त्यानंतर येथील इमले पुन्हा एकदा उभे राहू लागले. आता या झोपडय़ांची उंची इतकी वाढली आहे की, त्यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाचा पुलही गिळंकृत करून टाकला आहे. येथील झोपडीदादांना अशा पद्धतीने हातपाय पसरण्याची मुभा देऊन पालिका, रेल्वे आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने या पुलावरून चालणाऱ्या हजारो प्रवाशांच्याही जिवाचा खेळ चालविला आहे.

पश्चिम रेल्वेमधून जाताना वांद्रे रेल्वे स्थानक जवळ येऊ लागताच पूर्वेला दृष्टीस पडतो तो बेहरामपाडा. एके काळी दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडय़ांची जागा आता प्लायवूड आणि पत्र्यांच्या साहाय्याने उभे राहिलेले पाच पाच मजली इमले घेऊ लागले आहेत. काही झोपडय़ांचे सांगाडे लोखंडी खांबांवर पक्के बांधकाम करून, तर काही झोपडय़ा चक्क पत्र्याच्या साहाय्याने उभ्या करण्यात आल्या आहेत.  या झोपडय़ा इतक्या फोफावल्या आहेत की वांद्रे रेल्वे स्थानकातून पूर्वेकडे जाणारा पूल दोन्ही बाजूंनी झोपडय़ांनी बंदिस्त केला आहे. जणू या झोपडय़ांच्या पोटोमधून रेल्वेचा पूल जावा. या झोपडय़ांच्या खिडक्यांमधून पुलावर उडी मारता येते. पुलावरील फेरीवाल्यांकरिताही या झोपडय़ा आश्रयस्थान झाल्या आहेत.

पत्रे व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत

कुर्ला येथील पत्र्याचे काही घाऊक व्यापारी येथील दलालांच्या संपर्कात असून इमारत बांधकामासाठी मागणीनुसार त्यांच्याकडून पत्रे उपलब्ध केले जात असून या अनधिकृत बांधकामांमुळे त्यांचाही व्यवसाय तेजीत आला आहे. लाल रंगाचा (रेड ऑक्साइड) मुलामा चढवून हे पत्रे गंजून खराब होऊ नयेत याचीही काळजी घेतली जाते. काही झोपडय़ा चक्क प्लायवूडच्या साहाय्यानेही उभ्या करण्यात आल्या आहेत. जेमतेम एक माणूस वर जाऊ शकेल इतक्या लहान लाकडी जिन्यातून या झोपडय़ांच्या वरच्या मजल्यावर जावे लागते. एखाद्या झोपडीस आग लागल्यास ही संपूर्ण वस्तीच क्षणात भस्मसात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

झोपडय़ांमध्ये गोदामे आणि कारखाने

तयार कपडय़ांचा व्यवसाय करणाऱ्यांनी या झोपडपट्टीत गोदामे आणि कारखाने सुरू केले आहेत. या कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कपडे तयार करून करण्यात येत असून मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये जकात चुकवून ट्रेनमधून त्यांचा पुरवठा केला जात आहे. काही झोपडय़ांमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचीही निर्मिती करण्यात येत आहे.

वीज-पाण्याची चोरी

या झोपडपट्टीतील काही झोपडय़ांमध्ये विजेचे मीटर आहेत. परंतु अनधिकृत इमारतींत सर्रास विजेची चोरी होते. तसेच झोपडपट्टीतून जाणाऱ्या मोठय़ा जलवाहिनीला छिद्र पाडून पाण्याची चोरी केली जात आहे. वीज आणि पाण्याची विक्री करणारे माफिया मात्र गब्बर झाले आहेत. काही वेळा वीज चोरीविरुद्ध कारवाई करण्याचे प्रयत्न वीजपुरवठा कंपनीकडून करण्यात येतात. मात्र कारवाईची माहिती मिळताच झोपडपट्टीतून सर्व पुरावे नष्ट केले जातात. त्यामुळे कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागते. एकंदर परिस्थिती पाहता बेहरामपाडा लाक्षागृह बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तीन ते आठ लाखांत इमला

पत्र्याचे पाच मजली बांधकाम उभे करण्यासाठी साधारण तीन लाख रुपये, तर पक्की झोपडी उभारण्यासाठी सात-आठ लाख रुपये खर्च येत आहे. या झोपडय़ांमधील खोल्या चार हजार ते आठ हजार रुपये दराने भाडय़ाने दिल्या जात आहेत.

तक्रारी केली होती

बेहरामपाडय़ामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाच मजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली. परंतु पालिकेचे अधिकारी कारवाईच करीत नाहीत. इतर नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये बैठी घरे आहेत. तेथे मजले चढविल्यास पालिका अधिकारी तात्काळ कारवाई करतात. मग बेहरामपाडय़ातच का कारवाई करीत नाहीत? तक्रार केल्यानंतर पालिका अधिकारी येतात आणि पैसे घेऊन जातात. त्यामुळे कारवाईच होत नाही.

– गुलिस्ता शेख, काँग्रेस नगरसेविका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal slum area at bandra behrampada capture bandra skywalk
First published on: 03-06-2016 at 02:28 IST