मुंबई : राज्य सरकारने होमिओपॅथी व आधुनिक वैद्यक शास्त्र (ॲलोपॅथी) या दोन्ही चिकित्सा क्षेत्रांतील तज्ज्ञांशी विचार विनिमय करण्यासाठी अभ्यास समिती स्थापना केली असून या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी आणि व्यवसाय करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शुक्रवारी पुकारलेला बंद मागे घेतला.
आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ‘आयएमए’ने ११ जुलै रोजी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची दखल घेऊन गुरूवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगनटीवार यांनी ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
२०१४ मध्ये महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या अधिनियमामध्ये सुधारणा करून आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी दिली. तसेच या होमिओपॅथी डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय लोकांच्या आरोग्यास व रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण करणारा असल्याने आणि वैद्यक शास्त्रातील डॉक्टरांची विश्वासार्हता कमी करणारा असल्याने ही मान्यता रद्द करण्याची विनंती आयएमएने या बैठकीत केली.
याची दखल घेऊन यासंदर्भात दोन्ही चिकित्सा क्षेत्रातील तज्ञांशी विचारविनिमय करून शासनास समग्र अहवाल सादर करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या समितीने दोन महिन्यांत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच समितीचा अहवाल लक्षात घेऊन पुढील कार्यवाही होईपर्यंत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने होमिओपॅथी व्यावसायीकांची सुरू केलेली नोंदणी संदर्भातील प्रक्रिया तूर्त थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोण आहे समितीमध्ये
वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष संचालनालयाचे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलगुरू, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, आयुष संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक, महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी परिषदेचे प्रबंधक यांची सदस्य म्हणून, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रबंधकांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.