लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्या अपूर्ण शवविच्छेदन अहवालाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, सलमान खान याच्यावर आपण कोणतेही आरोप केलेले नाहीत किंवा त्याच्याविरोधात कारवाईची मागणीही केलेली नाही, असे नमूद करून याचिकेतून सलमान याचे प्रतिवादी म्हणून नाव वगळण्याची तयारी अनुज याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात दाखवली.

अनुज याच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येविरोधात अनुजच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनुज याची आत्महत्या संशयास्पद असल्याचा दावा करून त्याच्या आईने प्रकरणाच्या सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे. अनुज याच्या मृत्युची महानगरदंडाधिकारी तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) केल्या जाणाऱ्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी सरकारला दिले होते.

आणखी वाचा-सीईटी परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी तपास यंत्रणेचा प्राथमिक चौकशी अहवाल अनुज याच्या शवविच्छेदन अहवालासह मोहोरबंद पाकिटात न्यायासयात सादर केला. त्याचवेळी, अनुज याच्या कोठडी मृत्युची महानगरदंडाधिकाऱ्यांतर्फे अद्याप चौकशी सुरू असल्याचेही न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालन खंडपीठाने अनुज याचा शवविच्छेदन अहवाल वाचल्यानंतर तो अपूर्ण असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अनुज याने गळफास लावून घेतला तर त्याच्या मानेवरील जखम तसेच शरारीवरील इतर जखमांसारख्या महत्त्वपूर्ण तपशीलाचा शवविच्छेदन अहवालात समावेश नसल्यावर खंडपीठाने बोट ठेवले.

अनुज याचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. परंतु, गळा दाबूनही मृत्यू होऊ शकतो, अशी टिप्पणीही न्यायमूर्ती बोरकर यांनी अपूर्ण अहवालाबाबत नाराजी व्यक्त करताना केली. त्यानंतर, सरकारी वकिलांनी अनुज याच्या शवविच्छेदनाचा पुरवणी अहवाल न्यायालयात सादर केला व शवविच्छेदन अहवाल अपूर्ण नसल्याचा दावा केला. या अहवालात, अनुज याच्या शरीरावरील जखमांच्या खुणांचा उल्लेख करण्यात आला होता. हा अहवाल अनुज याच्या कुटुंबीयांना वाचण्यासाठी उपलब्ध करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले.

आणखी वाचा-पस्तीस टक्के पदे रिक्त, निवडणुकीचे काम तरीही बारावीचा निकाल वेळेत

दरम्यान, याचिकेत सलमान याच्यावर कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, प्रतिवादी म्हणून याचिकेतून त्याचे नाव वगळण्याची मागणी सलमान याची बाजू मांडताना वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाकडे केली. याचिकेत प्रतिवादी करण्यात आल्याने सलमान याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे. तसेच, तो कोणत्याही पद्धतीने अनुज याच्या मृत्युला जबाबदार नसल्याचा दावाही पोंडा यांनी केला. किंबहुना, या प्रकरणी सलमान हाच पीडित आहे. कोणीतरी त्याच्या घरावर हल्ला केला. परंतु, त्यामागे कोणाचा हात आहे आणि कोणाला अटक करण्यात आली आहे याबाबत सलमान अनभिज्ञ आहे, असेही पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, सलमान याच्याविरोधात कारवाईची मागणी केलेली नाही. त्यामुळे, त्याचे नाव याचिकेतून वगळण्यास तयार असल्याचे अनुज याच्या कुटुंबीयांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.