मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२० मध्ये बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३,८९४ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीतील विजेते गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना जुलै २०२३ पासून घराचा ताबा देण्यास सुरुवात केली. पाच महिन्यांमध्ये आठ टप्प्यांमध्ये १,४७० विजेते कामगार आणि त्यांच्या वारसांना घरांचा ताबा देण्यात आला आहे. आता उर्वरित विजेत्यांच्या पात्रता निश्चितीला वेग देऊन शक्य तितक्या लवकर त्यांनाही घरांचा ताबा देण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न आहे.

हेही वाचा… रेल्वेतील धूरशोधक यंत्रणा निष्क्रिय

हेही वाचा… मुंबई : रस्ताकडेला अवैधरीत्या वाहने उभी करण्याविरोधात मोहीम, सुरक्षारक्षक नेमणुकीचा महापालिकेचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारने गिरणी कामगारांचे घरांसंबंधीचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती कार्यान्वित झाल्यापासून या तीन गिरण्यांमधील पात्रता निश्चिती आणि घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. घरांचा ताबा देण्यास १५ जुलैपासून सुरवात करण्यात आली असून आतापर्यंत १४७० विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार आता मंडळाने सोडतीआधीच उर्वरित एक लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविली असून तीन महिन्यांत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने ९५ हजार ८१२ कामगार – वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. त्यापैकी ७२ हजार ०४१ कामगार आतापर्यंत पात्र ठरले आहेत. या विशेष मोहिमेला महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या कामगारांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांना एक संधी मिळाली आहे. त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन मंडळाने केले आहे.