मुंबई : Karnataka election 2023 NCP राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमाविलेला राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेच्या नऊ जागा लढवीत आहे. सीमा भागात निपाणीमधून पक्षाचा उमेदवार रिंगणात असेल. राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमाविला. हा दर्जा पुन्हा प्राप्त करण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत. या दृष्टीने कर्नाटकमध्ये नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
सीमा भागात व शक्यतो बेळगावीमध्ये उमेदवार उभे करायचे नाहीत, असे पक्षाचे धोरण होते. पण निपाणी या सीमा भागातील मतदारसंघात उत्तम पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला असला तरी राष्ट्रवादीच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने कर्नाटकमध्ये ‘घडय़ाळ’ चिन्ह पक्षाला दिले आहे. पक्षाने १५ जणांची स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील क्राईड क्रॅस्ट्रो, शिवाजी गर्जे यांचा यादीत समावेश केला आहे. अजित पवारांसह राज्यातील अन्य कोणत्याही नेत्यांचा स्टार प्रचारकांचा यादीत समावेश केलेला नाही.