मुंबई : लोकसभा निवडणुकांचा खरा खेळ नव्या युगातील नव्या माध्यमांवर अधिक खेळला जात आहे. प्रत्येक पक्षाच्या तथाकथित ‘वॉर रुम’मध्ये मोबाइल, लॅपटॉप या आधुनिक शस्त्रांद्वारे सेकंदागणिक पोस्ट, रील्स, ट्विट, रिपोस्टच्या माध्यमातून प्रचारयुध्द सुरू असल्याचे एकीकडे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यभरात गावागावांतून पथनाट्य, भारूड, गोंधळी, वासुदेव अगदी नंदीबैलाच्या माध्यमातून घरोघरी प्रचार सुरू आहे. या पारंपरिक प्रचारसाधनांसाठी ‘लाख’मोलाचे पॅकेजेस दिले जात आहेत.

पथनाट्यांचा उपयोग निवडणुकीच्या काळात मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरांमध्येही केला जातो, असे ‘अभंग क्रिएटिव्ह’च्या विशाल भालेकर यांनी सांगितले.

हेही वाचा…दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन तरूणीचे केले अश्लील चित्रीकरण; बलात्कार, खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा

‘आम्ही परभणीत ९० पथनाट्ये सादर केली. साधारणत: मतदारसंघातील गावांची यादी ठरवून दिली जाते. पथनाट्यांसाठी संबंधित पक्षाची ध्येयधोरणे, त्यांनी केलेली कामे, उमेदवाराची माहिती असा सर्वसमावेशक उल्लेख असलेली संहिता तयार केली जाते, एका पथनाट्याच्या खेळासाठी ४ ते ५ हजार रुपये मिळतात. एकाच वेळी ३०० – ५०० – ७०० पथनाट्यांचे प्रयोग करण्यासाठी करारबध्द केले जाते’ असे विशाल भालेकर यांनी सांगितले.

गावखेड्यात वा शहरातही घरातील प्रत्येकाला मोबाइल वा समाजमाध्यमांच्या वापर सफाईदारपणे करता येतो असे नाही. ‘समाजमाध्यमांवर सध्या कसली चलती आहे याविषयी अनभिज्ञ मतदारांपर्यंत पारंपरिक पध्दतीनेच गोष्टी पोहोचवाव्या लागतात. त्यासाठी वासुदेव, भारूड किंवा गोंधळाच्या माध्यमातून उमेदवारांची माहिती पोहोचवली जाते. अनेक ठिकाणी नंदीबैल फिरवत ‘सांग सांग भोलानाथ… कोण निवडून येणार’ हा खेळही रंगवला जातो. काही ठिकाणी हाताने रंगवलेल्या फलकांचा उपयोग केला जातो, रिक्षा फिरवत प्रचार केला जातो. निवडणुकीच्या काळात घरोघरी उमेदवाराची माहिती पोहोचवण्यासाठी पारंपरिक प्रचारसाधने अधिक प्रभावी ठरतात’ अशी माहिती लीड मीडियाच्या तेजस सातव यांनी दिली.

हेही वाचा…“काँग्रेसचे हात मराठी माणसांच्या रक्ताने माखलेले, त्याच हाताशी उद्धव ठाकरेंनी…”; आशिष शेलार यांचे टीकास्र!

निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवाराची माहिती,चिन्ह, पक्षाची ध्येय धोरणे गावातील मतदाराच्या गळी उतरवायची तर पारंपरिक प्रचारसाधनेच प्रभावी ठरतात. त्यातही सर्वाधिक खर्च पथनाट्यांवर केला जातो.

एकांकिकेतील कलाकारांना काम

वर्षभर राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धांमधून काम करणाऱ्या कलाकारांना हा निवडणुकीचा काळ सुगीचा ठरतो. या काळात कुठेही काम नसल्याने ही मंडळी गावोगाव प्रचारासाठी पथनाट्य करतात. त्यांना पैसेही मिळतात, राहण्या-खाण्याचा खर्चही त्यात समाविष्ट असतो.

हेही वाचा…पॅलेस्टाईन-इस्त्रायल संदर्भात पोस्ट केली म्हणून शाळेच्या मुख्यध्यापिकेला मागितला राजीनामा; मुंबईतील प्रकार

एकावेळी ५०० ते हजार पथनाट्यांचे पॅकेज

एका पथनाट्याच्या खेळासाठी ४ ते ५ हजार रुपये निवडणुकीच्या काळात मोजले जातात. पथनाट्यासाठी संस्था – कलाकार निवडताना एकावेळी ५०० ते हजार खेळांसाठी करार केला जात असल्याने २५ ते ५० लाखांपर्यंतचा खर्च पथनाट्यांसाठी केला जातो.