मुंबई : बोरिवली येथील न्यू लिंक रोडवरील झाशीची राणी लक्ष्मीबाई तलावात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक २० वर्षीय युवक बुडाल्याची दुर्घटना घडली. मोहम्मद अल्ताफ शरीफ शेख (१८) असे त्या युवकाचे नाव होते. संबंधित युवकाला पोहता येत नव्हते. तलावात पडल्यानंतर पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, तो अयशस्वी ठरला.

त्यानंतर पाण्यात कोणीतरी पडल्याचे एका मच्छीमाराच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने पाण्यात उतरून युवकाला बाहेर काढले आणि उपचारासाठी नजीकच्या शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी अल्ताफ शेख याला मृत घोषित केले.

दरम्यान, जुहू येथील समुद्रकिनारी गोदरेज गेट परिसरात शुक्रवारी दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली होती. पोहण्यासाठी समुद्रात गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यातील एका तरुणाला समुद्र किनाऱ्यावरील जीव रक्षकांनी वाचवले होते. मात्र, विघ्नेश देवेंद्रन (२०) बेपत्ता होता. अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेनंतर संबंधित तरुण सापडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.