सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) अधिकारी असल्याचे भासवून एका टोळीने झवेरी बाजारातील व्यावसायिकाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची घटना सोमवारी घडली. या तोतया अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाकडून रोख २५ लाख रुपये आणि एक कोटी ७० लाख रुपये किंमतीचे तीन किलोचे सोने लंपास केले. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी २४ तासांच्या आत या घटनेचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली. तर, संशयित तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच, रोख १५ लाख रुपये आणि २.५ किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

झवेरी बाजारातील एका सराफाच्या दुकानात सोमवारी दुपारी २ वाजता दोन व्यक्ती आल्या. त्यापैकी एकाने दुकानातील कामगाराच्या कानशिलात मारली. तुमच्या दुकानावर ईडीने धाड टाकली असल्याचे तोतया अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, व्यावसायिक विराटची चौकशी करीत तोतया अधिकाऱ्यांनी सर्वांचे मोबाइल ताब्यात घेतले. तोतया अधिकाऱ्यांनी कामगारांना कार्यालयातील रोख रक्कम, सोने व इतर मौल्यवान ऐवज एकत्र करण्यास सांगितले. यामध्ये एकूण २२ कॅरेटचे एकूण २.५ किलो सोन्याची बिस्किटे, ५०० ग्रॅम सोन्याची लगड, एका कपाटातून २५ लाख रुपयांची रोख रक्कम बनावट ईडी अधिकाऱ्यांनी जप्त केली. तसेच एका कामगाराला हातकडी घालण्यात आली. तसेच, तक्रारदाराच्या जुन्या कार्यालयात तोतया महिला ईडी अधिकाऱ्याने धाड टाकली. कामगारांनी मालक गावी असल्याचे सांगितले. त्यानंतर कामगारांची हातकडी काढण्यात आली आणि सर्व तोतया अधिकाऱ्यांनी पळ काढला.

हेही वाचा – मुंबई : मध्य रेल्वेवरील जलद लोकल मंदावली, विद्याविहार जवळ महानगरी एक्स्प्रेसमध्ये बिघाड

हेही वाचा – मुंबई : माघी गणेशोत्सवासाठी मंडपांचे शुल्क माफ, गेल्यावर्षीच्या परवानगीच्या आधारे परवानगी मिळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराने घडलेल्या घटनेची माहिती इतर व्यापाऱ्यांना दिली. याप्रकरणाची शहानिशा करून तक्रारदाराने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करण्यात आली. या गुन्ह्याची अवघ्या २४ तासांमध्ये उकल करून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. डोंगरी येथील राहणारा आरोपी मोहम्मद फजल सिद्दीक गिलिटवाला (५०), मालवणी येथे राहणारा आरोपी मोहम्मद रजी अहमद मोहम्मद रफीक उर्फ समीर (३७) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तसेच रत्नागिरीतून आरोपी विशाखा मुधोळे हिला अटक केली. तसेच, या गुन्ह्यातील अटक आरोपींकडून रोख १५ लाख रुपये आणि २.५ किलो सोने हस्तगत करण्यात आले. या प्रकरणातील तीन संशयीत आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती ‘परिमंडळ २’चे पोलीस उप आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली.